Jalgaon YIN Summit | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

तरुणांमधून प्रगत शेतकरीही तयार व्हावेत : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 14 जून 2018

करिअर निवडायचे असेल तर मार्गदर्शन जरुर घ्या, मात्र आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते आधी ठरावा, त्यासाठी मानसिकता तयार करा. उच्च शिक्षणाचा विचार करताना शेती, मातीशी आपलं नातं कायम ठेवून प्रगत शेतकरी म्हणूनही तयार व्हावे, अशी भावनिक साद शिवसेना नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणाईला घातली. 

जळगावात यिन आयोजित 'समर युथ समिट'चे थाटात उद्‌घाटन 

जळगाव : करिअर निवडायचे असेल तर मार्गदर्शन जरुर घ्या, मात्र आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते आधी ठरावा, त्यासाठी मानसिकता तयार करा. उच्च शिक्षणाचा विचार करताना शेती, मातीशी आपलं नातं कायम ठेवून प्रगत शेतकरी म्हणूनही तयार व्हावे, अशी भावनिक साद शिवसेना नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणाईला घातली. 

सकाळ माध्यम समुहाच्या डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) तर्फे आजपासून (ता.14) लाडवंजारी समाज सभागृहात आयोजित 'समर यूथ समिट'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव नगरीचे महापौर ललित कोल्हे, या समिटचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, 'यिन'चे मुख्य समन्वयक तेजस गुजराथी, 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे उपस्थित होते. 

समाजाचं पुस्तक वाचा
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या 'समिट'चे उद्‌घाटन झाल्यानंतर तरुणाईस मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, "जीवनात वाचनाला महत्त्व आहे. मात्र, त्यासाठी केवळ पुस्तकंच वाचली पाहिजे, असं नाही. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उच्च शिक्षण न घेताही राजकीय शिक्षणात मंत्रिपदापर्यंत पोचला. त्यासाठी समाजाचं वाचन केलं पाहिजे. त्यातून बरेचकाही शिकण्यासारखे असते. आमच्यावेळी पाच वह्यांमध्ये वर्षभराचे शिक्षण व्हायचे. आता दहावी पास होताच हाती 14 हजारांचा मोबाईल असतो. 'सकाळ'सारखा समूह नेतृत्वविकासाच्या चार गोष्टी सांगतो. अशा सुविधा असताना तरुणाईने किती प्रगती केली पाहिजे? व्यवसाय, उद्योग कोणताही करा, मात्र चोरी-चपाटीपासून दूर राहून." चार ठिकाणी नोकरी मागण्यापेक्षा चार जणांना नोकरी देण्याची धमक ठेवा, असे सांगताना गुलाबराव पाटलांनी 'नजर नजर मे रहना भी कमाल होता है... बुलंदियो पे ठहरना भी कमाल होता है..' हा शेर सादर करत तरुणांची मने जिंकली. 

दिशादर्शक उपक्रम : सुनील पाटील 
तत्पूर्वी स्पेक्‍ट्रम अॅकॅडमीचे सुनील पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ''तीन वर्षांपासून या समिटसोबत काम करण्याची संधी मिळतेय. राज्यातील तरुणाईसाठी हा उपक्रम दिशादर्शक असून अशा उपक्रमांमधून उद्याचे यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील नेतृत्व विकसित होत आहे.'' 

सुरवातीला अनिता पाटील यांच्या ग्रुपने योगावर अत्यंत अप्रतिम अशा कलाकृतीसह गणेशवंदना सादर केली. मान्यवरांच्या स्वागतानंतर समिटचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात निवासी संपादक विजय बुवा यांनी 'सकाळ' व यिनच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेत 'यूथ समिट'मधील विविध सत्र, त्यांच्या उपयुक्ततेबद्दल माहिती दिली.

उद्‌घाटन सत्राचे सूत्रसंचालन मोहिनी सोनार व किशोर निकम यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या 'समिट'मध्ये जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील सुमारे पाचशेवर महाविद्यालयीन तरुण- तरुणी सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख