धुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष 

राजकारण काय...ते कसे चालते ? हे आमच्या घरात कुणालाच माहीतच नव्हते. गावात वडिलांची चहाची टपरी. लग्नानंतर सासरी आले. पतीचे किराणामालाचे दुकान होते. गावाकडे आर्थिक गणित जमेना. म्हणून पतीसोबत मुंबईत गेले. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घराचे काम मिळाले अन्‌ मला उद्धव ठाकरे यांच्या साडूकडे धुणीभांड्याचे काम. धुणीभांडे ते जळगाव झेडपीचे अध्यक्षपद असा माझा राजकीय प्रवास आहे असे उज्ज्वला पाटील यांनी सांगितले.
धुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष 

पती आणि सासर-माहेरच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेला यश मिळाले याचे मला समाधान आहे. कधी ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ असे स्वप्नही मी पाहिले नव्हते असेही त्या सांगून जातात. आपल्या राजकीय वाटचालीबाबत त्या म्हणाल्या, "" वडीलांची परिस्थितीही जेमतेमच होती. त्यामुळे त्यांना मदत व्हावी म्हणून मी आईदसोबत मजुरी करण्यास जात असे.'' 

पुढे लग्न झाले. पती एका किराणा दुकानात कामाला होते. जशी माहेरची परिस्थिती तशीच सासरीही होती. गावात आर्थिक ओढाताण होत असल्याने पुढे आम्ही पोटासाठी मुंबईत गेलो. मुंबईत बऱ्यापैकी जम बसत चालला होता. 

वडाळा-वडळी (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) हे माझं माहेर. माझे शिक्षणही जेमतेम चौथीपर्यंतचे. माझे लग्न मामाच्या मुलाशी (कासोदा, ता. एरंडोल) झाले आहे. 1992 मुंबईत गेल्यानंतर आपणही काहीतरी काम करून संसाराला हातभार लावावा असे मला वाटत होते. त्याच वेळी उद्वव ठाकरे यांचे साडू श्री. सरदेसाई यांच्याकडे घरकामासाठी महिलेची आवश्‍यकता होती. पतीच्या ओळखीने आपल्याला त्यांच्याकडे धुणीभांडी करण्याचे काम मिळाले. 

पुढे उद्धव ठाकरेंच्या परवानगीनेच आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत स्थलांतर केले. तेथे बिगारीचे काम सुरू केले. हळूहळू त्यांनी छोटीमोठी कामे घेण्यास सुरवात केली. कंत्राट घेऊ लागल्याने दोन पैसेही हातात पडू लगले. एक बिगारी ते कंत्राटदार असा पतीचाही प्रवास आहे. त्यांनी यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. व्यवसायात चांगला जम बसवला होता. 

मुंबईत आपण यशस्वी झालो याचा आनंद ऐकीकडे होताच, पण, ज्या गावातून आपण आलो. त्या गावासाठी आपल्या माणसासाठी काही तरी केले पाहिजे ही ओढ पतींना नेहमीच सतावत होती. त्यांनी 2006 मध्ये कासोदा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन केले. लोकांना मदत करण्यास सुरवात केली. छोटी समाजसेवाच समजा हवे तर. गरीबांना मोफत उपचार कसे मिळतील तसेच ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना मुंबईतील चांगल्या रुग्णालयात भरती करून मदत करण्यास सुरवात केली. रूग्ण बरा झाला की त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आम्हालाही खूप आनंद वाटत असे. 

समाजकार्यामुळे जनसंपर्क वाढला. 2012 मध्ये जळगाव जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. त्यांचा कल काहीसा भाजपकडे होता. मात्र लोकांच्या आग्रहाखातर कासोदा अडगाव गटातून शिवसेनेतर्फे त्यांनी निवडणूक लढविली. उत्तम जनसंपर्कामुळे त्यांना यश मिळाले. ते झेडपीचे सदस्य आणि पुढे उपाध्यक्षही बनले. 

2014 मध्ये विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर एरंडोल-पारोळा मतदार संघातून निवडणूक लढविली. अर्थात शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. इकडे झेडपी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यांनी पुन्हा झेडपीची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. मात्र यावेळी ते भाजपचे झेडपी सदस्य बनले होते. 

पती राजकारणात होते. मी कधी राजकारणात प्रवेश करेन असे स्वप्नही मी पाहिले नव्हते. पण, त्याचे झाले असे की पुढे 2017 मध्ये जळगाव झेडपीची निवडणूक लागली. अध्यक्षपद महिला राखीव गटासाठी जाहीर झाले. कासोदा अडगाव गट महिला राखीव झाला. अर्थात पतींऐवजी मला भाजपने तिकीट दिले. मी निवडूनही आले आणि झेडपीची अध्यक्षही बनले. झेडपीचे सदस्य हेच आपले राजकारणातील पहिल पाऊल ठरले. 

अल्प शिक्षण असतांनाही आपल्याला भाषणाची कधीही अडचण आली नाही. ग्रामीण शैलीत बोलून लोकांची मने जिंकली. विकासकामांची माहिती देत होते. प्रारंभी सभागृह चालविताना थोडी भीती वाटत होती. ताण येत होता. आज मात्र मी स्वत: निर्णय घेत असते. ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर असते. एक महिला म्हणून पाण्याचे महत्व मला कळले आहे. पाण्यासाठी माझ्या भगिनींना कशी वणवण करावी लागते याची जाणीव आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मी आगही असते. 

कासोदा येथे 11 कोटीची पाण्याची पाईप लाईन मंजूर केली केली आहे. त्यानंतर वैद्यकिय सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याकडेही आपला कल असतो. लोकांसाठी विशेषत: महिलांच्या प्रश्‍नांकडे प्रत्येकाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे मला वाटते. धुणीभांडी ते झेडपीचे अध्यक्ष असा माझा प्रवास राहिला आहे. 
जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. कोणतेही काम निष्ठेने केले की त्यात यश मिळतेच यावर माझा विश्वास आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com