Jalgaon MP AT Patil about not getting Party Ticket | Sarkarnama

पक्षातील काही मंडळीनी षडयंत्र केल्यानेच उमेदवारी कापली : खासदार ए.टी.पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 मार्च 2019

पक्षातील काही मंडळींनी आपल्याविरुद्ध षडयंत्र रचले त्यामुळे आपली उमेदवारी कापली गेली असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी कापलेल्या खासदारात जळगाव लोकसभा मतदार संघातील ए.टी.पाटील यांचा सामावेश आहे.

जळगाव  : पक्षातील काही मंडळींनी आपल्याविरुद्ध षडयंत्र रचले त्यामुळे आपली उमेदवारी कापली गेली असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी कापलेल्या खासदारात जळगाव लोकसभा मतदार संघातील ए.टी.पाटील यांचा सामावेश आहे. पक्षाने त्यांच्या ऐवजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवार जाहिर केल्यानंतर त्यांची भूमिका काय? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. खासदार पाटील यांची सोशल मिडीयावर 'क्‍लिप'ऐन निवडणूकीच्या काळात व्हायरल करण्यात आली होती.

पारोळा येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल, जिल्हा चिटणीस सुरेंद्र बोहरा, जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष ऍड. अतुल मोरे, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, धीरज महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रवीण दाणेज, अजित मन्सुरी, गोपाल अग्रवाल, भावडू राजपूत, समीर वैद्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, "दहा वर्षे लोकसभेत प्रतिनिधित्व केले संसदेतील आपला कामाचा अहवाल चांगला आहे. त्यामुळे आपल्यालाच पक्षश्रेष्ठी उमेदवारी घोषित करतील, असा पूर्ण विश्वास होता. मात्र, पक्षाने आपली उमेदवारी नाकारल्याने मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज झाले. काहींना रडू कोसळले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवार सायंकाळी बालाजी मंदिर येथे मेळावा होणार आहे. त्यांच्याशी हितगूज करून मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करू. गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचा एकनिष्ठ पाईक म्हणून काम केले. मतदारसंघातील उपेक्षित कामांना प्राधान्य देण्याची भूमिका वेळोवेळी घेतली. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नाबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांत पक्षसंघटना वाढीस लावली. मात्र, काही मंडळींनी आपल्या विरोधात षड्‌यंत्र रचून डाव साधण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर अन्याय झाला आहे. कार्यकर्त्यांशी हितगूज करून मेळाव्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत.

संबंधित लेख