Jalgaon Collectors Cleanliness Drive | Sarkarnama

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची स्वच्छता मोहिम

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 जुलै 2017

जळगावचे आयुक्त जीवन सोनवणे निवृत्त झाल्यावर जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकराकडे प्रभारी पदभार आला. शहरातील नागरीकांच्या तक्रारीची त्यांना माहिती होतीच त्यांनी महापालिकेत जावून आढावा घेतला, त्यानंतर अचानक एके दिवशी सकाळी सहा वाजेपासूनच शहरात सफाई पाहणी सुरू केली.

जळगाव : प्रशासकीय अधिकाऱ्यावर जनतेचा कायमच रोष असतो. परंतु जळगावात मात्र सद्या जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्यावर जळगावची जनता फारच खुष आहे. जे अनेक वर्ष महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला साध्य करता आले नाही. ते त्यांनी प्रभारी आयुक्तपदाचा पदभार घेताच अवघ्या काही दिवसात साध्य करून दाखविले आहे.

स्वच्छताच होत नसल्यामुळे नागरिकांची तीव्र नाराजी होती. मात्र निबांळकरांनी पाहणीचा धडकाच लावल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे, एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षापासून अस्वच्छतेच्या छायेत असलेले गोलाणी मार्केट थेट बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची सफाई सुरू झाली असून ते आता चकाचक दिसू लागले आहे.

जळगाव महापालिकेच्या कारभारामुळे जळगावकर जनता त्रस्त आहे. रस्त्यावर खड्डे आहेत, तर साफसफाई होतच नव्हती, तक्रार करावी तर महापालिकेतून त्याची दखलही घेतली जात नव्हती. या ठिकाणी पदाधिकारी केवळ नावालाच सत्तेवर आहेत. तर विरोधकही असहाय्य आहेत. दुसरीकडे साफसफाईच होत नसल्याने नागरिक त्रस्त होते, रस्त्याची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. हे सुधारणारच नाही असे जनतेला वाटत होते. मात्र चमत्कार व्हावा तसा प्रकार जळगावात घडला आहे.

जळगावचे आयुक्त जीवन सोनवणे निवृत्त झाल्यावर जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकराकडे प्रभारी पदभार आला. शहरातील नागरीकांच्या तक्रारीची त्यांना माहिती होतीच त्यांनी महापालिकेत जावून आढावा घेतला, त्यानंतर अचानक एके दिवशी सकाळी सहा वाजेपासूनच शहरात सफाई पाहणी सुरू केली. शहरात असलेल्या घाणीचे त्यांनी स्वत:च फोटो काढले, त्यानंतर नागरिकांशी चर्चा केली आणि महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना सफाईचे आदेश दिले. त्यानतंर त्यांनी शहरात विविध भागात फिरण्याचा त्यांनी धडकाच लावला, त्यांच्या धाकामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला, सुस्त असलेले सफाई कर्मचारी कामाला लागले आणि शहरात सफाई होवू लागली.

सफाईची पाहणी करीत असतानाच त्यानीं मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या गोलाणी संकुलाची पाहणी केली या ठिकाणी असलेला कचरा पाहून ते आचंबित झाले. दुसरीकडे याच गोलाणीतील कचऱ्याप्रकरणी एका नागरिकाने याचिका दाखल केली होती. त्यावरही प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी सुनावणी घेवून स्वच्छतेसाठी मार्केट बंद करण्याचे आदेश दिले. प्रभारी आयकुत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाच आदेश असल्याने त्यानीं तातडीने अमंलबजावरी करीत रविवारी (ता.16) दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे दुकानदारांची पाचावर धारण बसली त्यानंतर झालेल्या बैठकीत सफाईबाबत निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी तो मान्य करीत ट्रायल म्हणून पहिले तीन महिने महापालिकेने सफाई करायची त्यानंतर एका कंपनीकडे सफाईची कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेनंतर दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्यापाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आज महापालिकेने गोलाणी संकुलात सफाई अभियानंच राबविले या ठिकाणाहून तब्बल सोळा ट्रक्‍टर कचरा काढण्यात आला. सर्व संकुल स्वच्छ दिसू लागले. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: येवून पाहणी केली. कालपर्यंत प्रत्येक ठिकाणी कचरा असलेले हे व्यापारी संकुल चकाचक झाले होते. व्यापारीही या मुळे खुश झाले तर नागरिकही सुखावले आहेत. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जी सफाई मोहिम हाती घेतली आहे त्याचे जनतेते स्वागत केले असून जळगाव महापालिकेचे प्रभारी आयुक्तपद काही दिवस त्यांच्याकडे राहू द्यावे असा सूर व्यक्त होत असून त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागून इतर कामेही व्यवस्थित होती, असा विश्‍वास जनतेला आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यावर जनतेची तीव्र नाराजी वाढली आहे. हे काम अगोदर पदाधिकाऱ्यांनी करण्याची गरज होती. ते मात्र सतरा मजलीच्या आपल्या वातानुकूलीत दालनात बसून असतात. असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख