Jalgaon CM's Meeting Preparations | Sarkarnama

जळगावात एकीकडे मराठा मोर्चाचा इशारा अन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

जळगावात महापालिका निवडणूकीसाठी एक ऑगस्टला मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष विरूध्द शिवसेना अशी लढत आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडीही मैदानात आहेत. मात्र भाजप व शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत. महापालिकेत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेवरील जैन यांची सत्ता खालसा करून भाजपचा झेंडा फडकविण्याच्या निश्‍चय केला आहे.

जळगाव : "मराठा आरक्षण जाहिर करावे, मगच मुख्यमंत्र्यांनी जळगावात यावे,'' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस उद्या (ता.30) पक्षाच्या महापालिका निवडणुकीतील प्रचारासाठी येण्याची शक्‍यता असून सागर पार्क येथे सभेची तयारीही अंतीम टप्प्यात आहे. त्यामुळे आता सभेकडे जळगावकरांचे लक्ष आहे. 

जळगावात महापालिका निवडणूकीसाठी एक ऑगस्टला मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष विरूध्द शिवसेना अशी लढत आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडीही मैदानात आहेत. मात्र भाजप व शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत. महापालिकेत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेवरील जैन यांची सत्ता खालसा करून भाजपचा झेंडा फडकविण्याच्या निश्‍चय केला आहे. त्यासाठी त्यांनी जळगावातच ठिय्या ठोकला आहे. 

विशेष म्हणजे माजी मंत्री भाजप नेते एकनाथ खडसेही प्रचारात जोमाने उतरले आहेत. तर जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदारही प्रचारात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे विद्यमान सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जोरदार प्रचार करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर, गफ्फार मलीक, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, काँग्रेसतर्फे माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ.राध्येश्‍याम चौधरी प्रचारात आहेत. 

एमआयमएमतर्फे ओवेसी यांची सभाही जळगावात घेण्यात आली. प्रचार आता अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरविण्याची तयारी आहे. परंतु, मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना जळगावात येण्यास विरोध करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे मात्र मुख्यमंत्र्याची सभा घेण्याचा निश्‍चय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सागर पार्क येथे सभेची तयारीही सुरू करण्यात आली आहे. सागर पार्क येथे वॉटरप्रुफ तंबुही सभेसाठी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय या ठिकाणी सुरक्षा बॅरेकेडसही उभारण्यात आले आहेत. 

त्यामुळे उद्या (ता. 30) ही सभा होईल हे निश्‍चित आहे. मात्र, याबाबत पक्षातर्फे अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र रात्री उशीरा त्यांचा दौरा जाहिर होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची सभा जळगावात होणार की नाही, याकडेच जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख