jalgaon-cm-corporator-meet | Sarkarnama

नगरसेवक होणे गतजन्मीचे `पाप'; महापौर होणे `महापाप' : मुख्यमंत्री फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

जनता नगरसेवकाला प्रत्येक बाबतीत जबाबदार धरत असते. त्यांच्या नगरसेवकाकडूनच प्रत्येक अपेक्षा असतात. त्यामुळे आपल्याला असे वाटते गतजन्मी पाप करणारा नगरसेवक होतो आणि महापाप करणार "महापौर'होतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र यांनी जळगावात नगरसेवक बैठकीत व्यक्त के

जळगाव : जनता नगरसेवकाला प्रत्येक बाबतीत जबाबदार धरत असते. त्यांच्या नगरसेवकाकडूनच प्रत्येक अपेक्षा असतात. त्यामुळे आपल्याला असे वाटते गतजन्मी पाप करणारा नगरसेवक होतो आणि महापाप करणार "महापौर'होतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र यांनी जळगावात नगरसेवक बैठकीत व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून नगरसेवकांची बैठक घेतली. "सकाळ'ने याबाबत आज मुख्यमंत्र्यांना अवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.  महापालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे तब्बल 57 नगरसेवक निवडून आले आहेत. पक्षाचा प्रथमच महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आले होते. मात्र आढावा बैठक, नाटयगृह उद्‌घाटन आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामकरण आनंद सोहळा असे कार्यक्रम होते. पक्षाच्या नगरसेवकांना भेटीचा त्यांचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे नगरसेवक नाराज होते. मात्र "सकाळ' ने आज "मुख्यमंत्री महोदय आम्हालाही भेटा'या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून नगरसेवकांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेवून आढावा बैठक झाल्यानंतर नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेतली. एवढेच नव्हे तर सर्व 57 नगरसेवकासमवेत फोटोसेशनही केले. यावेळी नगरसेवकांनी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. 

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिता वाघ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने अतिशय मोठा विजय मिळविला आहे, त्याबद्दल अभिनंदन. विजय मोठा असल्यास जनतेच्या अपेक्षाही मोठ्या असतात.त्यामुळे लोक प्रश्‍न विचारत असतात. जनतेला नगरसेवकाकडून मोठ्या अपेक्षा असतात नगरसेवकांने त्या सोडविल्या नाहीत तर नाराजी निर्माण होते. त्यामुळे नगरसेवक होणे गतजन्मीचे "पाप' तर महापौर होणे "महापाप'आहे असे आपणास वाटते. 

जनतेशी संपर्क ठेवा 
नगरसेवकांच्या कार्याबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, जनतेकरीता नगरसेवक हाच पहिला संपर्काचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे नगरसेवकानेही जनतेच्या संपर्कात राहिले पाहिजे. नगरसेवकाला पद, प्रतिष्ठा मिळाली कि त्यांच्या डोक्‍यात जाते, त्यामुळे नगरसेवकांनी ती डोक्‍यात जावू न देता जमीनीवरच राहून जनतेशी संपर्क ठेवावा. यावेळी त्यांनी जळगाव महापालिकेला भरपूर निधी दिला जाईल असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

संबंधित लेख