जैन-महाजन दोस्ती..महापालिका निवडणूक भाजप-सेनेची 'नुरा कुस्ती'? 

जैन यांना सोडून काही विदयमान नगरसेवक भाजपत दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे अनेक नगरसेवक जैन यांचे निष्ठावान होते. ते अचानक भाजपमध्ये कसे दाखल झाले? लगेच त्यांना उमेदवारी कशी मिळाली असा संभ्रम आजही जनतेच्या मनात आहे.
mahajan--Jain
mahajan--Jain

जळगाव : जळगाव महापालिका निवडणूकित भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन आणि भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची दोस्ती आहे.त्यांनी निवडणूकीतही काही उमेदवाराविरूध्द सोयीचे उमेदवार दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हि निवडणूक दोन्ही नेत्यांची "नुरा कुस्ती'आहे काय?असा प्रश्‍न जनतेत निर्माण झाला आहे. 

जळगाव महापालिकेच्या निवडणूकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस व समाजवादी आघाडी हे प्रमुख पक्ष मैदानात आहेत. मात्र सद्य स्थितीत शिवसेना आणि भाजप यांच्यातच लढत होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेवर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे.तर भाजप महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

या अगोदर भाजपचे नेतृत्व एकनाथराव खडसे यांच्याकडे होते. खडसे व जैन एकमेकांचे कट्टर विरोधक असल्यामुळे काट्याची लढत होत असे. मात्र यावेळी भाजपचे नेतृत्व गिरीश महाजन करीत आहेत. जैन व महाजन यांची मैत्री असल्याचे कुठेही लपून राहिलेले नाही. त्यामुळे दोघानीही निवडणूकीत पक्षाची युती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपतून जोरदार विरोध झाल्याने महाजन यांनी माघार घेतली.

त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जाहिर केले आहेत. जैन यांना सोडून काही विदयमान नगरसेवक भाजपत दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे अनेक नगरसेवक जैन यांचे निष्ठावान होते. ते अचानक भाजपमध्ये कसे दाखल झाले? लगेच त्यांना उमेदवारी कशी मिळाली असा संभ्रम आजही जनतेच्या मनात आहे. त्यातच दोन्ही पक्षांनी जाहिर केलेल्या उमेदवारी यादीत अनेक ठिकाणी समन्वयाने लढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 विशेष म्हणजे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्याना डावलण्यात येवून जैन यांच्यां गटातून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे या शंकेला बळ मिळाले असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यात चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडीत भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे मात्र "नामनिराळे'आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.उमेदवार जाहिर होण्याच्या प्रक्रियेत त्यांचा कोठेही सहभाग नव्हता. त्यांच्याच काही समर्थकाविरूध्दही शिवसेनेकडून पक्‍के उमेदवार देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

एकीकडे भाजप-सेना आमने सामने लढत आहे. दुसरीकडे जैन व महाजन यांची दोस्ती आहे. दोन्हीही नेते त्यांचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी दिलेल्या उमेदवारीमुळे ही निवडणूक "नुरा कुस्ती'आहे काय?असा प्रश्‍न अद्याप तरी जनतेच्या मनात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com