आमदार मुळीक यांची धडक कारवाई की फोटो सेशन ?

आमदार मुळीक यांची धडक कारवाई की फोटो सेशन ?


पुणे ः पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार जगदीश मुळीक हे नवीन आमदार झाल्यानंतर त्यांनी गेल्या अडीच वर्षांत त्यांनी शासनाच्या किंवा पुणे महापालिकेच्या अनेक कार्यालयांना "अचानक' भेटी दिल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, वाहिन्यांना बाईट दिले, समस्यांची पाहाणी करतानाची छायाचित्रे झळकली. गेल्या अडीच वर्षांत हे सारे जमूनही गेले. मात्र भेट दिलेल्या कार्यालयाच्या कामकाजात कणभरही सुधारणा होत नसल्याने आमदार मुळीक यांची भेट ही केवळ "फोटोशेसन' पुरती असते की काय, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. 

वडगाव शेरीतील पुणे महापालिकेच्या टॅंकर पॉइंटवर पाण्याचा काळाबाजार चालतो, अशा बातम्या आल्यानंतर मुळीक यांनी सदर ठिकाणी मीडीयाच्या लवाजम्यासह 17 मे रोजी भेट दिली. अगोदरच निरोप दिल्याने हजर असलेल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी सगळ्यांसमोर चांगले खडे बोल सुनावले. त्याचे फोटोही काढले. आता यातील गंमत अशी की, हा "टॅंकर पॉइंट' आमदार मुळीक यांच्या कार्यालयापासून काही मीटर अंतरावर आहे. तसेच आमदारांचे बंधू योगेश मुळीक हे गेल्या पाच वर्षांपासून याच भागाचे नगसेवक आहेत. मग या "टॅंकर पॉंइट'ला भेट देण्यासाठी आमदारांनी इतका उशीर का केला, हा प्रश्न त्यामुळे काहींनी उपस्थित केला. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीआधी प्रत्येक भाषणात राष्ट्रवादीवर टॅंकर माफिया म्हणून टीका करून आमदार मुळीक टाळ्या मिळवायचे. मात्र सत्ता येऊन अडीच वर्षे झाल्यानंतरही या परिस्थितीत बदल झालेला नाही. 

स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदार मुळीक यांनी या पूर्वी येरवडा येथील रेशनिंग कार्यालय, मनोरूग्णालय, ससुन रूग्णालय, पक्षी अभयारण्य अशा विविध ठिकाणी भेटी देऊन फोटो काढून घेतले होते. परंतु तेथील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालाच नाही. या साऱ्या परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी वडगाव शेरीतील टॅंकरचा काळाबाजार थांबतो का, स्वपक्षातील टॅंकरमाफियांना मुळीक कसे आवरतात, टॅंकरची संख्या कितीने कमी होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठऱणार आहे. तरच या "अचानक भेटी'चा उपयोग होईल. या पाण्यातील टॅंकरचा काळाबाजार रोखण्यासाठी येथील यंत्रणा ऑनलाइन करणे, या पॉंइंटवर कॅमेरे बसविणे असे उपाय आवश्‍यक आहेत. मात्र भेट देवून तात्पुरती "हवा' होते. नंतर पहिले पाढे पंचावन्न, असाच प्रयोग सुरू असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवातून दिसून येते. 

याबाबत आमदार मुळीक यांनी या आपल्या भेटीचे समर्थन करताना सांगितले की या भागातील पाणीपुरवठा अधिकारी आणि टॅंकर माफिया यांचे संगनमत आहे. पालिकेच्या पाण्याचे टॅंकर हे बाटलीबंद पाण्याच्या प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात जात होते. पालिकेचे पाणी थेट बाटल्यांत भरून विकण्याचा काही मंडळींनी धंदा सुरू केला आहे. त्याला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची फूस आहे. टॅंकरचे रजिस्टर नीट ठेवलेले नव्हते. किती टॅंकर भरले गेले, किती दिले गेले, कोणाला दिले गेले, याचा कोणताच हिशोब नाही. येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायला मी सांगितल्या आहेत. त्यातील दोघांच्या बदल्या झाल्या आहेत. सोसायट्या किंवा लोकवस्तींना पाणी पुरवण्याच्या नावाखाली ते चढ्या दराने मॉल, हॉटेल यांना विकले जाते. त्याचा सगळा भांडा फोड या भेटीमुळे झाला आहे. आगामी काळात संबंधितांवर वचक ठेवण्यात येईल. या ठिकाणी टॅंकरमध्ये पाणी भरताना पाणी मीटरही नादुरूस्त आहे. तो बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक टॅंकरला जीपीएस बसविण्यास सांगितले आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com