Jadhav , Adsul, Gavli gearing up for elections ? | Sarkarnama

जाधव, अडसूळ, गवळीं निवडणुकीच्या पूर्वतयारीस लागले ?

अरूण जैन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

विदर्भातील बुलडाण्यात प्रतापराव जाधव, यवतमाळ-वाशिम मध्ये भावनाताई गवळी व अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ असे तीन खासदार आहेत. 

बुलडाणा: मुंबईत कालच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत पुन्हा स्वबळाची गर्जना झाली. विद्यमान खासदारांना पुन्हा संधीचीही चर्चा झाली. त्यामुळे निवडणुकीला वेळ असला तरी विदर्भातील सेना खासदारांना प्रचारासाठी तब्बल आठ महिने मिळाल्यात जमा आहेत. 

विदर्भातील बुलडाण्यात प्रतापराव जाधव, यवतमाळ-वाशिम मध्ये भावनाताई गवळी व अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ असे तीन खासदार आहेत. 

 यांच्यासाठी एक गोष्ट चांगली अशी आहे की त्यांना पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने लोकसभा मतदारसंघात आतापासूनच व्यूहरचना करण्यासाठी पुरेसा अवधी आहे. तुलनेने  इतर पक्षांच्या उमेदवारांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर होईल, त्यानंतर जुळवाजुळव व नंतर धावाधाव अशी स्थिती राहिल. ही बाब शिवसेनेला पूरक असली तरी वस्तूस्थिती वाटते तेवढी सोपी नाही.

गेल्या 2014 च्या निवडणुकीत उमेदवारांनाही अपेक्षित नसेल एवढे मताधिक्य मिळाले. ते का? आणि कोणत्या लाटेमुळे मिळाले हे नव्याने सांगण्याचे कारण नाही. आता यावेळी लाटेची वाटच वेगळी ठेवण्याचा घाट सेना नेत्यांनी घातला आहे. शिवाय ताकदीने शिवसेनेने केली अशी कामे ना राज्यातील आहेत, ना केंद्रातील. मग निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार ही समस्याच आहे. ज्या भाजपला सव्वाचार वर्षे शिव्याच घातल्या पण त्यांच्याचसोबत सत्तेचा श्रीखंडही चाखला. ही वस्तुस्थिती आहे. 

तिकडे अमरावतीत खासदार अडसूळांसमोरील अडचणीत दररोज वाढच होत आहे. भावनाताईंही मोदीजींना राखी बांधून आल्या. (ओवाळणी काय मिळेल ?) प्रतापरावांना मोदी लाटेने तारले. अशा परिस्थितीत पक्षाने उमेदवारी देऊ केली असली तरी मैदानात कोण उडी घेतो आणि कोण कोलांटउडी घेऊन परक्या छावणीत दाखल होतो. याची वाटच पहावी लागणार आहे.

संबंधित लेख