islampur khot on shetty | Sarkarnama

शेट्टींकडे पद्धतशीर बदनामीची यंत्रणा; आता आम्हाला पश्‍चात्ताप होतोय! 

शांताराम पाटील 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

राजू शेट्टींच्यापासून लांब गेलाला कार्यकर्ता बदनाम असतो. त्यांच्या जवळ असला की त्याला काशीहून गंगेतून धूऊन आणल्यासारखी त्यांची भूमीका असते, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 

इस्लामपूर (सांगली) : राजू शेट्टींच्यापासून लांब गेलाला कार्यकर्ता बदनाम असतो. त्यांच्या जवळ असला की त्याला काशीहून गंगेतून धूऊन आणल्यासारखी त्यांची भूमीका असते, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 

ते म्हणाले, "राजू शेट्टींनी बहुजन समाजातील नेत्याविरुध्द बहुजन समाजातील नेते व कार्यकर्ते गेली पंधरा वर्षे अगदी नियोजन पूर्वक वापरले आहेत. ज्या उल्हासदादांनी गुंडांच्याकडून शेट्टींना मारहाण होताना वाचवले. उल्हासदादांचे डोके फुटले. त्या उल्हासदादांची शेट्टींनी काय अवस्था केली. हे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्र जाणतो. आपल्या सोयीनुसार लोकांचा वापर करायचा ही शेट्टींची फार जुनी चाल आहे. त्यांच्यातून एखादा कार्यकर्ता बाहेर गेला. त्याला पध्दतशीर बदनाम करण्याची यंत्रणा वापरायची. आवाडेंच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यावेळी शेट्टींनी आवाडे कारखानदारांचे उमेदवार आहेत, असे लोकांना सांगितले. आता त्याच आवाडेंच्या गळ्यात गळा घालून शेट्टी फिरत आहेत. आवाडेंच्या घरातील उमेदवाराला जिल्हा परिषद निवडणुकीत पाठींबा दिला. त्यावेळी शेट्टींना घराणेशाही दिसली नाही. आता आवाडेंच्या इतका स्वच्छ उमेदवार नाही असे ते दाखवत आहेत. आवाडेंना काशीहून शेट्टींनी धूवूून आणले काय? 

ते म्हणाले, शेट्टींच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या चळवळीत राज्यातील अनेक लोकांचे जास्त योगदान आहे. मात्र सफाईदार पणे खोटे बोलण्यात शेट्टींचा कोण हात धरु शकत नाही. निवेदिता मानेंच्या विरोधात निवडणूक लढवताना त्यांच्यावर हीन पातळीवर टिका करायला व अफवा पसरवण्यासाठी शेट्टींनी स्वतंत्र यंत्रणा राबवली होती. त्यावेळी शेट्टींच्या बरोबर आम्ही असल्याचा आम्हाला पश्‍चाताप होतो. पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली. अजित पवार व शरद पवार यांच्याविरोधात भाषणे करायला लावली. आता पवार साहेब अभ्यासू असल्याचा साक्षात्कार शेट्टींना झाला आहे. हा साक्षात्कार त्यावेळी झाला असता तर चंद्रकांत नलवडे व कुंडलीक कोकाटे या दोन कार्यकर्त्यांचे बळी गेले नसते. 

संबंधित लेख