ips sandeep patil book collection for gadchiroli district | Sarkarnama

सातारकरांनी संदीप पाटलांना 10 हजार पुस्तके भेट दिली, त्यांनी ती गडचिरोलीला पाठवली! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

संदीप पाटील यांची दोन दिवसांपुर्वी साताऱ्यातून पुणे ग्रामीणला बदली झाली आहे. तेथेही श्री. पाटील यांनी बुके नको पुस्तके आणा... हा उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे. 

सातारा : आयपीएस अधिकारी म्हणजे करारी, मग त्यांच भले-बुरे अनुभव असतात. तरीही या अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले तर निश्‍चितच समाजात अमुलाग्र बदल होतो. आयपीएस संदीप पाटील यांनी त्यांच्या स्वागताला येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यातून तब्बल दहा हजार 600 पुस्तके भेट मिळाली. तीच पुस्तके नक्षलग्रस्त गडचिरोलीत पाठविण्यात आली आहेत. 

गडचिरोली येथे पोलिस अधीक्षक असताना संदीप पाटील हे नक्षलग्रस्त आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या ध्येयाने झपाटले होते. नक्षलवाद्यांच्या दहशतीमधील लोकांना मूळ प्रवाहात जोडण्यासाठी ज्ञानाची क्रांती घडविणारे प्रयोग सुरू केले. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून तेथे पोलिस स्टेशन, ग्रंथालयांत पुस्तके उपलब्ध करून दिली. परिणामी हे युवक नक्षलवादापासून दूर राहण्यास मदत होऊ लागली. 

श्री. पाटील साताऱ्याचे पोलिस अधीक्षक झाल्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. त्याला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल दहा हजार 600 पुस्तके भेट दिली. राज्य-देशाचा इतिहास, महापुरुषांचे चरित्र, भौगोलिक, धार्मिक, विज्ञान साहित्य, कादंबऱ्या, कवितांसह लहान मुलांसाठीची पुस्तकेही मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पुस्तके गडचिरोलीला पाठवण्यात आली. दुर्गम भागातील पोलिस ठाण्यात तसेच 33 वाचनालयात ही पुस्तके उपलब्ध केली आहेत. दुर्गम भागात पोलिसांसोबतच गावातील युवा आणि विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत वाचायला मिळत आहेत. पोलिस आणि नागरिक यांच्यातही या वाचनालयाच्या माध्यमातून नवे नाते तयार होत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख