IPS पी. आर. पाटलाची महिला काॅन्स्टेबलला एक कोटी कॅशची आॅफर, तक्रारीनंतर पलायन

IPS पी. आर. पाटलाची महिला काॅन्स्टेबलला एक कोटी कॅशची आॅफर, तक्रारीनंतर पलायन

नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित 29 वर्षीय महिला शिपाई ही 2009 साली नागपूर ग्रामीण पोलिस दलात भरती झाली होती. सुरुवातीला ग्रामीण पोलिस मुख्यालयात नेमणुकीला होती. 2016 मध्ये ती प्रतिनियुक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात दाखल झाली. पोलिस अधीक्षक प्रद्मुम्न पाटील हे 2017 मध्ये या विभागात रुजू झाले. तिला बघताच पाटील त्यांचा तिच्यावर जीव जडला. पाटील यांनी तिला कॅबिनमध्ये बोलावून खासगी मोबाईलचे क्रमांक दिला. रात्री फोन करण्यास सांगितले. तुला मोबाईल क्रमांक दिला, ही बाब कुणालाही कळता कामा नये, अशी तंबीही दिली. दुसऱ्या दिवशी तू मला कॉल का केला नाहीस? तू पीएसआयची तयारी करतेस ना! अशी विचारणा केली. "मला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. तुला पाहिल्यानंतर तीन ते चार महिने मी तुझ्याबद्दल माहिती घेतली. तू स्वामी समर्थाची भक्त आहेस. तू माझी व्हावी अशी स्वामींचीसुद्धा इच्छा आहे, असे पाटील म्हणाल्याचे तक्रारीत नोंदविले आहे. 

पाटील दोन वेगवेगळ्या मोबाईलवरून तिच्याशी बोलायचे. वरिष्ठ अधिकारी असल्याने सुरुवातीला ती बोलत होती. बोलणे रेकॉर्डवर येऊ नये म्हणून त्यांनी व्हॉट्‌सऍप आणि व्हिडियो कॉल करायला सुरुवात केली. एकदा त्यांनी तिला कॉल करून "मला अंघोळ करून दाखव' अशी अजब मागणी केली होती. अधीक्षक पाटील हे चित्रकार असल्याने महिलांची अश्‍लील छायाचित्रे तयार करून ते महिला शिपायाला पाठवित होते. त्याचप्रमाणे ते तिला आपल्या बंगल्यावर बोलावत असत. महिला शिपायासोबत बोलता यावे याकरिता पाटील यांनी दाराला ब्लॅक फिल्म लावली होती. आपणास तासन्‌तास कॅबिनमध्ये बसवून ठेवत होते, असा आरोप महिलेने केला आहे. 

आरटीओ कार्यालयातून 25 लाख? 
आरटीओ, रजिस्टार कार्यालय येथून दरमहा 20 ते 25 लाख रुपये मिळतात. या विभागातील फक्‍त मोठ्या अधिकाऱ्यावर एसीबी ट्रॅप करायचा नाही, अशी अट आहे. ही वसुली कोण करतो त्याचे नावदेखील पाटील यांनी तिला सांगितले होते. याच पैशातून तिला पुण्यात एक फ्लॅट घेऊन देणार होते. तसेच आतापर्यंत मिळालेल्या पैशातून तिला एक कोटी रुपयेही देऊ केले होते. एवढेच नव्हे तर पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्‍त होईपर्यंत सर्व मदत करण्याचे आश्‍वासन अधीक्षक पाटील यांनी दिले होते, असे तिने तक्रारीत नमूद केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तू फक्‍त माझी हो...! 
"माझे माझ्या पत्नीशी पटत नाही. तू माझी प्रेयसी हो. तुझा दर्जा वाढेल. दिलेली ऑफर बॉंड पेपरवर लिहून देण्याचेही वचन दिले होते. त्यासाठी तिच्या बॅंक खात्याचा क्रमांकदेखील घेतला होता. ज्या पोलिस निरीक्षकाकडे ती लेखनिक म्हणून काम करायची त्याने विचारपूस केली असता सर्व प्रकार तिने सांगितला. पाटील हे अनेकदा तिच्यासमोर रडले आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्यांनी कॅबिनमध्ये बोलावून तिचा हात पकडला होता, असेही तक्रारीत उल्लेख असल्याचे समजते. 

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश 
काही दिवसांनंतर पाटील यांनी या महिला शिपायाला "तू ज्या पोलिस अधिकाऱ्यासोबत काम करीत आहेस त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल कर. तू जर माझे ऐकले नाहीस तर त्या अधिकाऱ्याशी तुझे अनैतिक संबंध होते सांगून तुला मूळ ठिकाणी पाठविण्याची धमकी दिली होती. तसेच त्या पोलिस अधिकारी आणि शिपायाचे अनैतिक संबंधाची तक्रारही प्राप्त झाल्याचे पाटील म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

गुप्तहेर लावले मागे 
महिला शिपायी प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांनी आपले गुप्तहेर तिच्यामागे लावले होते. त्याचप्रमाणे 12 ऑक्‍टोबरला सायंकाळी तिला तिच्या मूळ जागेवर परत पाठविण्याचा आदेश काढला. त्यानंतर चार दिवसांत तिचा आदेश मागे घेतला. त्यानंतर ज्या अधिकाऱ्यासोबत महिला शिपायी काम करीत होती त्या अधिकाऱ्याला त्रास देणे सुरू केले होते. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या महिला शिपायाने पोलिस महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्‌यावर आले. 

पाटील अचानक रजेवर 
पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी चार वाजतापूर्वीच ते कार्यालयातून बेपत्ता झाले. त्यांनी लगेच रजा टाकून पुण्याला पळ काढल्याची माहिती समोर आली. सदर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पाटील यांना कधीही अटक होऊ शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com