Internal rift in MIM on Urdu boards stunt MLA IMtiaj Jaleel | Sarkarnama

  उर्दू भाषेत  फलक लावण्यावरून एमआयएममध्ये जुंपली 

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 1 मार्च 2018

उर्दू बोर्ड महापालिकेवर लावण्याचा नगरसेवक सय्यद मतीन यांनी केलेला प्रकार हा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट होता, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे एमआयएमने स्पष्ट केले आहे. 

औरंगाबाद :  मराठी राजभाषा गौरव दिनाच्या दुसऱ्याच दिवशी औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी उर्दू भाषेतील फलक लावून खळबळ उडवून दिली होती. आज (ता. 1) महापालिका प्रशासनाने हा बोर्ड काढून टाकला. मात्र या फलक नाट्यामुळे एमआयएममध्ये चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले. उर्दू बोर्ड महापालिकेवर लावण्याचा नगरसेवक सय्यद मतीन यांनी केलेला प्रकार हा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट होता, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे एमआयएमने स्पष्ट केले आहे. 

सभागृहात गोंधळ घालणे, महापौरांचा दंड पळवणे, अंगावर धावून जाणे, हाणामारी करणे या प्रकारामुळे एमआयएमचे नगरसेवक नेहमीच चर्चेत राहिले आहे. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमचे 26 नगरसेवक विजयी झाले आणि पक्षाला आकाश ठेंगणे झाले. कधी पाणी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत सभागृहात तर विजेच्या प्रश्‍नावर सभागृहा बाहेर देखील एमआयएमने तोडफोड करत केली आहे. 

शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर असतांना एमआयएमच्या नगरसेवकाने उर्दू भाषेतील फलक लावत आपल्याला कचऱ्याशी काही देणेघेणे नसल्याचे कृतीतून दाखवून दिल्याची टिका सर्वच स्तरातून करण्यात आली. यातूनच आज एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी कालच्या प्रकाराशी एमआयएमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उर्दू भाषेतील फलक लावणारे नगरसेवक सय्यद मतीन यांनी हा प्रकार पक्षाला विश्‍वासात न घेता केल्याचे सांगितले जात आहे. सभागृहातील आपल्या वर्तनाने मतीन हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. अशा वागणूकीमुळे त्यांना जेलची हवा तर खावीच लागली पण निलंबनाच्या कारवाईलाही तोंड द्यावे लागले होते. आता उर्दू भाषेच्या नामफलकावरून मतीन यांनी केलेला उतावीळपणा देखील त्यांच्या अंगलट आला आहे. 

या संदर्भात एमआयएमचे आमदार व शहरातील नेते इम्तियाज जलील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनामाशी बोलतांना ते म्हणाले, " उर्दू भाषेतील फलक लावणे आणि सभागृहात विषय पत्रिका मिळाव्यात ही एमआयएमची भूमिका आहेच, पण ती कायदेशीररित्या पुर्ण व्हावी यासाठी आम्ही महापौर, आयुक्तांना रितसर निवेदन दिले आहे. त्यावर जेव्हा निर्णय व्हायचा तेव्हा होईल. पण आमच्या नगरसेवकाने काल केलेला प्रकार योग्य नव्हता, त्याचे मी समर्थन करत नाही. सय्यद मतीन यांच्याकडून वारंवार पक्षाच्या धोरणांची पायमल्ली केली जात आहे. "

" वारंवार समज देऊन देखील त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. कालच्या प्रकारामुळे पक्ष जातीयवादी असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. मला किंवा पक्षातील इतर कुणालाही विश्‍वासात न घेता केवळ श्रेय लाटण्यासाठी म्हणून मतीन यांनी उर्दू फलक लावला. या संदर्भात पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात आहे. "

संबंधित लेख