Instead of arresting Sambhaji Bhide government is trying to implicate elgaar conference workers | Sarkarnama

संभाजी भिडे यांना अटक करण्याचे सोडून एल्गार परिषद समर्थकांना अडकविण्याचे प्रयत्न  : प्रकाश आंबेडकर

दीपा कदम
बुधवार, 13 जून 2018

पंतप्रधानांना मारण्याचे पत्र जाहीर झाले आहे त्याबाबत विचारले असता श्री .  आंबेडकर यांनी आश्‍चर्य व्यक्‍त करत प्रसिध्द झालेल्या पत्राच्या सत्यतेबद्‌दल संशय व्यक्‍त केला. हे पत्र सत्य असेल आणि पंतप्रधांनांना धमक्‍या आल्या असतील तर त्यांच्या सुरक्षतेत वाढ केली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबई : "  पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ज्यांना गुरू मानतात त्या संभाजी भिडे यांना दंगल घडविण्याच्या आरोपाखाली अटक करण्याचे सोडून एल्गार परिषद समर्थकांना अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहे ", असा  आरोप  भारीप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला . 

 एल्गार परिषदेचे संयोजक माजी न्या. पी. बी. सावंत आणि न्या. कोळसे पाटील असताना त्यांच्याशी पोलीस चर्चाही न करता एल्गार परिषदेत सहभागी झालेल्यांना दंगलखोर ठरविले जात असल्याबाबत  नाराजी व्यक्‍त करून श्री . आंबेडकर पुढे म्हणाले ," एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याचे ठरवून अटक केली जात आहे हे चुकीचे आहे . एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून आर्थिक मदत मिळाली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे, त्याबाबतचे पुरावे ही पोलिसांनी जाहीर करावे . तसेच पोलिसांनी ज्या कार्यकर्त्यांना तथाकथित नक्षलवादी म्हणून अटक केली आहे त्यांच्याकडून जप्त केलेले डिजिटल पुरावे, पत्रे वगैरेही जाहीर करावे अशी माझी मागणी आहे ."

देशात आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न असून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालविला असल्याचा आरोप भारीपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. भाजपचा पोटनिवडणुकीत आलेल्या पराभवामुळेच सामाजिक अशांतता निर्माण केली जात असल्याचा संशय त्यांनीव्यक्‍त केला.

 

संबंधित लेख