प्रभावशाली IAS अधिकारी (२०१७) : तुकाराम मुंढे (पुणेकरांना दिलासा देणारा अधिकारी)

महाराष्ट्रात 2017 मध्ये काही आयएएसआणि आयपीएस. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाची मोहोर उमटवली आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुकर व्हावे, जनतेच्या पैश्याचा चांगलाच वापर व्हावा, कायद्याचा वचक राहावा, नियम कायदे सर्वांसाठी समान रहावेत, यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मावळत्या वर्षातील कामगिरीचा हा आढावा.....
प्रभावशाली IAS अधिकारी (२०१७) : तुकाराम मुंढे (पुणेकरांना दिलासा देणारा अधिकारी)

2005 च्या बॅचचे सनदी आधिकारी असलेले तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या बारा वर्षात विविध पदावर नऊवेळा त्यांची बदली झाली आहे. मात्र त्यांच्या कार्यशैलीत तसूभरदेखील फरक पडलेला नाही. त्यातही सोलापूर, नवी मुंबईतली त्यांची कारकिर्द अधिक गाजली. कुणालाही न जुमानता नियमाप्रमाणे काम ही त्यांची कामाची पद्धत. यामुळे अनेकवेळा राजकीय पदाधिकारी, सहकारी दुखावले जातात. मात्र यापैकी कुणाचीच तमा न बाळगता मुंढे यांचे काम सुरूच असते. 2017 हे वर्षही मुंढे यांच्यासाठी अपवाद ठरले नाही. 

त्यांचीं नऊ महिन्यांपूर्वी नवी मुंबईच्या आयुक्त पदावरून त्यांची बदली पुण्यात झाली. नवी मुंबईतील वर्षाचे पहिले तीन महिने तेथील नगरसेवकांशी पंगा घेण्यातच गेले होते. पुण्यात पुणे परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी 29 मार्चला सूत्रे घेतली. पीएमपीला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी गेल्या नऊ महिन्यात मुंढे यांनी विविध प्रयोग केले. त्याचबरोबर प्रशासकीय शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि पुणेकरांच्या सोयीनुसार पीएमपीच्या कामकाजात आवश्‍यक बदल करीत उत्पन्नात भरघोस वाढ केली. या काळात त्यांना जिवे मारण्याच्या धमक्‍यादेखील आल्या. मात्र कशालाही न डगमगता त्यांनी नेटाने काम सुरूच ठेवले आहे.

या काळात बसच्या मार्गांचा आढावा घेऊन गरजेप्रमाणे संबंधित मार्गावर बस कमी करणे किंवा वाढवणे यावर प्रामुख्याने भर दिला. शेकडो बेशिस्त आधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. ही संख्या पाहिली तर धक्का बसाला अशी परिस्थिती आहे. मुंढे यांच्या काळात 100 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दोनशेजणांना डिस्मिस्ड केले. शंभर जणांना निलंबित केले. याशिवाय तीनशे लोक मुंढे यांच्या रडारवर आहे. एका वर्षात एवढी प्रचंड कारवाई केलेले ते एकमेव आयएएस अधिकारी असावेत. 

कारवाई झालेल्यातील काहींना त्यांच्यावर विविध आरोपदेखील केले. मात्र पुणेकरांचा त्यांना या काळात भरघोस पाठिंबा मिळाला. कारण मुंढे यांनी केलेले बदल लोकांना रस्त्यावर दिसले. बसची संख्या वाढली. हवी तेव्हा बस मिळण्याचे प्रमाण वाढले. नऊ महिन्यात पीएमपीच्या ताफ्यात सुमारे शंभरहून अधिक बस वाढल्या. यातील जवळपास सर्व बस जुन्याच आहेत. मात्र छोट्या स्वरूपातील दुरस्तीच्या कामासाठी या बस उभ्या ठेवण्यात आल्या व ठेकेदारांच्या बस वाढवण्यात आल्या होत्या. मुंढे यांनी यात बदल करून बंद बस दुरूस्त करून रस्त्यावर आणल्या. परिणामी पीएमपीएमएलच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. सध्या पीएमपीएलचे रोजचे सरासरी उत्पन्न सुमारे सात लाख रूपयांनी वाढले आहे. याचे सारे श्रेय मुंढे यांना जाते. कर्मचारी तेच, बसदेखील त्याच, सारी व्यवस्था जुनीच, मात्र त्यात बदल करून योग्य दिशा देत मुंढे यांनी ही किमया करून दाखविली आहे. 

मुंढे यांच्या मते, "" अजून अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर करीत वाटचाल सुरू आहे. नव्या वर्षात नव्या बस खरेदी झाल्यानंतर परिस्थितीत आणखी सुधारणा होईल. या माध्यमातून पुणेकरांना अधिक चांगली सेवा देताना पीएमपीचे उत्पन्नदेखील वाढण्यास मदत होईल.'' त्यामुळे 2017 सालातही त्यांनी आपला प्रभाव दाखवून दिला आहे.

पुण्यातील नगरसेवकांनी त्यांना सर्वसाधारण सभेत आडवेतिडवे प्रश्‍न विचारायला सुरवात केल्यानंत ती सभा अर्धवट सोडून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी पत्करला होता. नगरसेवकांवर मात केल्याचे उलट लोकांना आवडले. खरे तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही दोन चाके असतात. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे ते फक्त प्रशासनाचे चाक वेगात पळवतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज राहतात. मात्र मुंढे हे रिझल्ट देत असल्याने त्यांच्यापुढे लोकप्रतिनिधींचेही फार काही चालत नाहीत. त्यामुळे मुंढे यांची धडाकेबाज शैली 2017 मध्येही कायम चर्चेत राहिली. पुण्यातील पीएमटी त्यांनी खरेच रूळावर (खऱ्या अर्थाने रस्त्यावर) आणली तर पुणेकर त्यांना दुवाच देतील. म्हणूनच 2018 मध्ये मुंढे यांच्या विविध योजनांना यश आले तर त्याचा फायदा पुणेकरांनाच होणार आहे. पुणेकरही मुंढे यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाहीत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com