infighting intensifies in Palghar Congress | Sarkarnama

पालघर काँग्रेसमध्ये दामोदर शिंगाडा -जिल्हाध्यक्ष केदार काळे यांच्यात सत्तासंघर्ष

सरकारनामा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

 नवीन आदिवासी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे मी किंवा माझ्या मुलगा त्यांनाच उमेदवारी द्या असे मानणारे अस्वस्थ झाले आहेत.  

- केदार काळे ,जिल्हाध्यक्ष

पालघर : पालघर जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये दोन गट निर्माण झाले असून पक्षात दुफळी माजल्याची चर्चा परिसरात चांगलीच चर्चेत आहे.

माजी खासदार दामोदर शिंगडा यांनी पालघर येथे कॉंग्रेस कमिटीची सभा घेऊन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पक्षविरोधी कार्य करत असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, असा ठराव मंजूर केला आहे, तर ही सभा अनधिकृत असल्याचा खुलासा जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी केला आहे.

पालघर येथील कॉंग्रेस भवनमध्ये माजी खासदार दामोदर शिंगडा यांनी नुकतीच कॉंग्रेस कमिटीची बैठक घेतली. बैठकीत कॉंग्रेस भवनचे विश्‍वस्त जी. डी. तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर पाटील, चंद्रकांत दादा पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा सचिव दिलीप पाटील, राजू चौधरी, सलीम पटेल, माजी तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, उपाध्यक्ष अशोक माळी, युवा नेते रोशन पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी पक्षविरोधी केलेल्या कामाबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तसा ठरावही मंजीर करण्यात आला.

 दरम्यान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले ," काही प्रस्थापितांचा माझ्यावर रोष   आहे . मी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नाविषयी आवाज उठवतो.  प्रस्थापित नेते स्वतःला निष्ठावान समजतात.   तसा आव आणतात . त्यांनी  कधीही जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही . "

" काही  पदाधिकारी निष्क्रिय आहेत. त्यामुळे  काही पदाधिकारी बदललेले आहेत.  मी पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न प्रयत्न केला.    नवीन आदिवासी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे मी किंवा माझ्या मुलगा त्यांनाच उमेदवारी द्या असे मानणारे अस्वस्थ झाले आहेत.  कॉंग्रेस पक्षाच्या इमारतीचा हिशेब गेली अनेक वर्षे दिला नाही . तो विचारल्यामुळे काही स्वतः ला जेष्ठ समजणारे दुखावले," असे श्री. काळे म्हणाले . 

" सर्वात महत्त्वाचे सर्व तालुकाध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.  तसेच पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास आहे . त्यामुळे मला बदलण्याच्या हालचाली नाहीत . तसेच कॉंग्रेसची बैठक घेण्याचा अधिकार हा माजी खासदार यांना कोणी दिला? तिमाही बैठक अनधिकृत आहे," असेही   जिल्हाध्यक्ष केदार काळे म्हणाले . 

संबंधित लेख