indutai patnkar | Sarkarnama

कॉम्रेड इंदुताईंना अखेर लाल सलाम! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 जुलै 2017

इंदुमती यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याआधी त्यांचे सुपुत्र कॉम्रेड भारत पाटणकर यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले,""माझी आई वाघीण होती. तिने घालून दिलेल्या वाटेवरून मी कधीही हटणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे. साने गुरुजींनी कष्टकरी वंचितांच्या न्याय हक्कासाठी सारे रान पेटवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मी तीच वाट चालत राहीन असा शब्द माझ्या आईला देतो.'' यापुढे कोणतेही धार्मिक विधी होणार नाहीत तसेच येत्या मंगळवारी (ता. 18) पदयात्री स्मारकात सकाळी दहा वाजता शोकसभा होईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. 

कासेगाव (जि. सांगली) : आता उठवू सारे रान.. आता पेटवू सारे रान ....या साने गुरुजींच्या शब्द स्फुल्लिंगांचा उद्‌घोष करीत शनिवारी स्वातंत्र्यसेनानी इंदुमती बाबुजी पाटणकर यांना अखेर निरोप देण्यात आला. तत्पूर्वी सकाळी गावातून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा निघाली. त्यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह राज्यभरातील पुरोगामी चळवळीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शुक्रवारी रात्री इंदुताई यांचे निधन झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते कासेगावच्या दिशेने निघाले. आज सकाळी नऊ वाजता गावातील पाटणकर यांच्या वाड्यापासून अंत्ययात्रेला सुरवात झाली. मारुती मंदिर रस्ता, जुने बसस्थानक, बाजार पेठ मार्गे अंत्ययात्रा बाबुजी पाटणकर लोकशास्रीय संस्थेच्या पटांगणात आली. कष्टकरी शेतमजूर महिलांच्या प्रश्‍नांसाठी आघाडीवर येऊन लढणाऱ्या या इंदुताईंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने आज रस्त्यावर चौका-चौकात आल्या होत्या. जागोजागी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून अश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली जात होती. राज्यभरातून आलेले डाव्या, कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते लाल सलाम...लाल सलामचे नारे देत होते. इंदुताई अमर रहे....इंदुताई को लाल सलामच्या घोषणांनी एकेकाळी पश्‍चिम महाराष्ट्रात कम्युनिस्टांचे लाल निशान फडकवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या इंदुताईंना अखेरची सलामी देण्यात आली. यावेळी अनेकांनी त्यांच्या सहवासातील त्या मंतरलेल्या क्षणांना उजाळा दिला. 

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील म्हणाले,""ताईंनी माहेरचा क्रांतिकार्याचा वारसा पुढे नेताना बाबुजींसारख्या निखाऱ्याचा संसार पेलला. त्या काळात या पंचक्रोशीत या दाम्पत्यांच्या कार्याचा दरारा मोठा होता. कासेगाव शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून कष्टकऱ्यांच्या लढ्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाचे सोनेरी पान आहे. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले आपल्याला त्यांच्या वाटेने पुढे जावे लागेल. तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.'' 
प्रा. बाबूराव गुरव म्हणाले,""इंदुताई समस्त पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माता होत्या. त्यांनी आपले आयुष्यच समाजासाठी वाहिले.'' 
शासनाच्यावतीने तहसीलदार सविता लष्करे यांनी पार्थिवास पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, शरद पाटील, आमदार मोहनराव कदम, मेधा पानसरे, धनाजी गुरव, कॉम्रेड उदय नारकर, ऍड. अजित सूर्यवंशी, संपतराव पवार, ऍड. बी. डी. पाटील, हुमायुन मुरसल, अस्लम तडसरकर, प्रा. मच्छिंद्र सकटे, स्वातंत्र्य सैनिक अध्यक्ष माधवराव माने आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

संबंधित लेख