indu sarkar, mumbai | Sarkarnama

"इंदू सरकार' इतिहासाचा  विपर्यास; कॉंग्रेसचा आक्षेप 

सरकारनमा ब्युरो 
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई : मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या "इंदू सरकार' चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, प्रदर्शनापूर्वी कोणालाही चित्रपट दाखविण्यास आपण बांधिल नसल्याचे स्पष्टीकरण भांडारकर यांनी दिले आहे. 

""या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस नेते संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, या चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,'' असा इशारा विखे पाटील यांनी पत्रात दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. 

या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर मधुर भांडारकर यांनी ""अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा माझा अधिकार मान्य केला पाहिजे. मला या चित्रपटातून कोणताही राजकीय हेतू साध्य करायचा असता तर गेल्या सहा महिन्यात ज्या निवडणुका झाल्या तेव्हा तो मी प्रदर्शित केला असता,'' असे सांगितले. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी कोणालाच दाखविला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
संबंधित लेख