INDIRA GANDHI, RASIKSHETH DHARIAWAL AND MISSED MlA SHIP | Sarkarnama

इंदिरा गांधी, रसिकशेठ धारीवाल आणि हुकलेली आमदारकी 

नितीन बारवकर
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांचे २४ आक्टोबर रोजी निधन झाले. रसिकलाल धारीवाल म्हणजे उद्योगात पूर्ण यशस्वी आणि मोठ्या राजकारणात अयशस्वी असे व्यक्तिमत्व ठरले. त्यांना शिरूर तालुक्‍याचे आमदार होण्याची मनीषा होती. त्यासाठी सारी योग जुळूनही आले होते. तरी त्यांचा दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. नंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीचा नाद सोडला आणि शिरूर शहरापुरतेच आपले राजकारण मर्यादित ठेवले. 

ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्‍यातील जुन्या मंडळींना आठवल्या त्यांच्या विधानसभेच्या दोन निवडणुका. थेट इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून त्यांनी राजकारणात जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा किस्सा रसिकलाल हे मोठ्या खुबीने खुलवून सांगायचे. त्यांना शिरूर पंचक्रोशीत "भाऊ' या नावानेच ओळखले जायचे. 

श्रीमती इंदिरा गांधी यांचे 1977 मध्ये सरकार पडल्यानंतर त्यांनी देशभर झंझावाती दौरा काढला होता. कॉंग्रेस सत्तेवर नव्हती. राज्यातील प्रमुख नेते हे इंदिरा गांधींना सोडून गेले होते. त्यामुळे दुसऱ्या फळीतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा इंदिरा गांधींचा प्रयत्न होता. जनता पक्षाच्या राजवटीविरोधात वातावरण तापविण्यासाठी त्यांनी देशभर दौरा आखला होता. या दौऱ्यासाठी त्या हेलिकॉप्टरने शिरूरला सभेसाठी आल्या होत्या. धारीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिरूरचा कार्यक्रम उरकून त्यांना तातडीने दिल्लीला जायचे होते. त्यामुळे सर्व कार्यक्रम थोडे घाईगडबडीतच झाले. 

सभा व भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर इंदिराजी जेव्हा हेलिपॅडकडे निघाल्या, तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये किरकोळ बिघाड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे इंदिराजी नाराज झाल्या. रसिकभाऊंनी ही नाराजी ओळखून तातडीने पुढे येत, ""तुम्ही नाराज नका होऊ, माझ्या मोटारीतून तुम्हाला तातडीने मुंबईला सोडतो, असे सांगत त्यांनी त्यांच्या ताफ्यातील आलिशान मोटार तातडीने हजर केली. या मोटारीतून इंदिराजींचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि या मोटारीचे सारथ्य अर्थातच रसिकभाऊ यांनी केले. या दीर्घ प्रवासात इंदिराजींचा करारी बाणा, राजकारणातील त्यांचे चातुर्य, त्यांच्या व्यक्तिमत्वातील बारकावे आणि अत्यंत विचारी राजकीय महिला नेत्याची रसिकभाऊंना जवळून जाणीव झाली. अर्थात या प्रवासात इंदिराजींनी रसिकभाऊंची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याविषयीची बारीकसारीक माहिती जाणून घेतली. 

सन 1980 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ऐन तारूण्यात असलेल्या रसिकभाऊंना त्यांच्या मित्रमंडळींनी विधानसभा निवडणूक लढविण्याची गळ घातली. त्यावेळी सर्व मित्रमंडळींसमवेत रसिकभाऊ मुंबईला उमेदवारी मिळविण्यासाठी गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या उपस्थितीत मुलाखत दिल्यानंतर ते मित्रांसमवेत बाहेर पडले. आपण नवखे, आपल्याला कसली उमेदवारी मिळणार, असा समज करून घेत ते सर्वजण मुंबईतील मेट्रो थिएटर मध्ये "शोले' सिनेमा पाहायला गेले. 

दरम्यान, इकडे मुलाखतीच्या ठिकाणी थेट इंदिराजींचा निरोप आला की, "वो शिरूरका रसिकलाल धारिवाल नाम का लडका आया है, उसे टिकट दीजिए'... झाले हा निरोप आला आणि रसिकभाऊंना शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली. अखेर ते मेट्रो थिएटर मध्ये असल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून थेट "मेट्रो' मध्ये संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा निरोप म्हटल्यावर चक्क चित्रपट मधेच थांबविण्यात आला व थिएटर मध्ये अनाऊन्सिंग करून धारिवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याविषयी सूचित करण्यात आले.

त्यानंतर धारिवाल यांना उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे 1984 च्या निवडणुकीत त्यांनाच कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. इंदिरा गांधी यांच्य हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने राज्यात दणकून विजय मिळवला. मात्र शिरूरची जागा ही शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेसचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांनी जिंकली. 

 भाऊंनी तालुक्याची निवडणूक लढविण्याचे डोक्‍यातून काढून टाकले व शिरूर शहराच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले. 1967 ला प्रथम नगर पालिकेची निवडणूक लढवून ते अवघ्या 23 व्या वर्षी नगराध्यक्षपदी विराजमान झाले. पुढे सलग 21 वर्षे त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले. शहराच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेला दबदबा काल त्यांच्या मृत्युच्या क्षणापर्यंत कायम होता. या दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, रामकृष्ण मोरे या नेत्यांशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी वरिष्ठ पातळीवरून गळ घालण्यात आली, मात्र त्यांनी ठामपणे नकार देत शहराच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केले. कधी बदलते स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे, अल्पसंख्याक समाजाची अल्प मते यामुळे त्यांचे "आमदार' होण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.  

 
 

संबंधित लेख