Indian forces attack bunkers of Pakistan in Naoushera sector | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भारतीय सैन्याने केले पाकिस्तानचे बंकर्स उध्वस्त (सोबत व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

लष्कराच्या लोकसूचना विभागाचे सरसंचालक मेजर जनरल अशोक नरुला यांनी दुपारी एक निवेदन करुन भारतीय सेनेने केलेल्या या 'दंडात्मक कारवाई'ची माहिती दिली. तसेच या हल्ल्यांची एक चित्रफीतही जारी केली. ही कारवाई म्हणजे ''सर्जिकल स्ट्राइक'' नव्हे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान सीमेवरील नौशेरा विभागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी साह्य करण्याच्या कृतीबद्दल भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे बंकर्स आणि नियंत्रणरेषेजवळची काही ठाणी उद्‌ध्वस्त करण्यात आली. सीमा न ओलांडता केवळ दंडात्मक म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे भारतीय सेनेतर्फे सांगण्यात आले. या कृतीमुळे उभय देशातील तणाव आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

लष्कराच्या लोकसूचना विभागाचे सरसंचालक मेजर जनरल अशोक नरुला यांनी दुपारी एक निवेदन करुन भारतीय सेनेने केलेल्या या 'दंडात्मक कारवाई'ची माहिती दिली. तसेच या हल्ल्यांची एक चित्रफीतही जारी केली. ही कारवाई म्हणजे ''सर्जिकल स्ट्राइक'' नव्हे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा परिसरात पाक सैन्यातर्फे सतत गोळीबार, हलक्‍या तोफा, हातबाँब, उखळी तोफा यांचा वापर करण्यात येत होता. यामागील प्रमुख उद्देश भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना संरक्षण कवच पुरविणे हा होता. परंतु पाकिस्तानतर्फे केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमुळे नियंत्रण रेषेलगतच्या गावांमध्ये जीवित व वित्तहानि, भारतीय सैन्याची हानि आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून भारतीय सैन्याने नौशेरा विभागात प्रत्युत्तरादाखल हल्ला चढविला. भारतीय हद्दीतूनच पाकिस्तानी लष्करी ठाणी आणि बंकर्सना लक्ष्य करण्यात आले आणि ते नष्ट करण्यात आले. दहशतवाद विरोधी व प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणूनच ही कृति करण्यात आल्याचे जनरल नरुला यांनी स्पष्ट केले.

उन्हाळा सुरु झाल्याने बर्फ वितळू लागल्यानंतर भारत-पाक सीमेवरील अनेक खिंडी व मार्ग खुले होऊ लागतात आणि दरवर्षीच या समारास दहशतवाद्यांची घुसखोरी वाढू लागते. यावर्षीही हे प्रकार सुरु झाल्यानंतर भारतीय सैन्याने त्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी ही कृति केली. आजच्या हल्ल्यात बंकर नष्ट करणारे बॉंब, रणगाडाविरोधी दारुगोळा यांचा वापर करण्यात आला होता. भारतावर विनाकारण हल्ले झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत आणि त्यास वेळेवर चोख प्रत्युत्तर दिले जाईल हाच या कृतीमागील हेतु असल्याचे लष्कारने स्पष्ट केले आहे.

लष्कराच्या निवेदनात दहशतवादी व घुसखोरांना नसते साहस न करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे. काश्‍मिरी जनतेने या घुसखोरांना मदत न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. काश्‍मीरी जनतेबद्दल, युवकांबद्दल लष्कराला पूर्ण सहानुभूती असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून युवकांनी या हिंसक मार्गाला जाऊ नये असेही आवाहन सेनेने केले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय सेनेच्या विशेष कमांडो तुकडीने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला होता व त्यात 35 दहशतवादी मारले गेले होते असा दावा करण्यात आला होता. ती कृति वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर आता भारतीय सेनेने आपल्याच हद्दीतून ही कारवाई केली आहे.

 

संबंधित लेख