indapur-vidhansabha-election-dattatrey-bharane-harshwardhan-patil | Sarkarnama

आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकमेकांवर घेताहेत तोंडसुख 

राजकुमार थोरात
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीचे वारे इंदापूर तालुक्यामध्ये सुसाट वाहू लागले आहे. खडकवासला, भाटघर व उजनीच्या पाण्याच्या प्रश्‍नावरुन वातावरण तापू लागले आहे. 

वालचंदनगर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीचे वारे इंदापूर तालुक्यामध्ये सुसाट वाहू लागले आहे. खडकवासला, भाटघर व उजनीच्या पाण्याच्या प्रश्‍नावरुन वातावरण तापू लागले आहे. 

आमदार दत्तात्रेय भरणे हे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर टीका करताना १९ वर्षात काय केले असा सवाल विचारत आहेत. तर पाटील १९ वर्षामध्ये  पाण्यासाठी   शेतकऱ्यांना रस्त्यावर आंदोलन करावे लागले नसल्याचे सांगू लागले आहेत. 

अंथुर्णेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचा मेळावा झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसने शक्तीप्रदर्शन करण्यास सुरवात केली. 
आमदार भरणे व माजी सहकारमंत्री पाटील एकमेकांवर टीकेचे झोड उडवुन तोंडसुख घेवू लागले आहेत. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनू लागला आहे. 

चालू वर्षी भाटघर व  खडकवासला धरणे तीन वेळा शंभर टक्के भरुन ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तसेच तालुक्यातील २७ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. शेटफळचा तलाव शंभर वर्षामध्ये सप्टेंबरमध्ये कोरडा पडला नव्हता. मात्र चालू वर्षी तलावात चिमणीला ही पिण्यास पाणी नाही. दौंड व पुरंदर तालुक्यातील पाझर तलावामध्ये पाणी सोडले जात आहे. 
उजनीचे पाणी कर्नाटकामध्ये जात आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. 

खडकवासल्याच्या सणसर कटमधून चार वर्षामध्ये एक थेंब ही पाणी येत नसल्यामुळे हक्काचे ३.२ टीएमसी पाणी दुसरीकडे जात असुन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची दुर्देवी वेळ आली असून निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे चार वर्षात तालुक्यातील पाण्याची वाट मोडली असल्याचे हर्षवर्धन पाटील सांगत असुन   लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेची लिमका बुक मध्ये नोंद करण्याची गरज असल्याचे सांगितले.  

आमदार भरणे हेही पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवत असून विरोध लबाड व खोटे बोलत असून  खोटे बोलण्याचे आठवे आश्‍चर्य असुन लिमका बुक मध्ये नोंद करण्याची गरज आहे.  चालू वर्षी वर्षी  एेन उन्हाळ्यामध्ये नीरा डावा कालव्याना सलग ११३ दिवस पाणी होते. कालव्याच्या इतिहासामध्ये एवढा दिवस पाणी आले होते का ? धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा झाल्यानंतर कालव्यातुन तातडीने पाणी सुरु आहे. तालुक्यामध्ये पाउस न पडल्यामुळे उभ्या पिकांना पाणी देवून पिके वाचविण्यास प्राधान्य दिले जात आहे.  मात्र  विरोधक पाण्याचे राजकारण करीत आहेत. १९ वर्षामध्ये पाण्यासाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती. विरोधकही कालवा सल्लागार समितीवर सदस्य असुन तेही जबाबदार असल्याचे सांगत आहेत. 

राष्ट्रवादी व कॉग्रेच्या आरोप-प्रत्यारोपामध्ये भाजपने उडी घेतली असून दोन्ही पक्ष नौटंकीपणा करीत असल्याची टीका करीत आहेत.

संबंधित लेख