Indapur Politics : dissent over 7 TMC water for Marathwada | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मराठवाड्याला ७ टीएमसी पाणी देण्यावरून  इंदापूरचे राजकारण तापणार

 राजकुमार थोरात 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

इंदापूर तालुक्यामध्ये  नीरा-भीमा व भीमा-सीना या बोगद्याची कामे वेगाने सुरु आहेत. यामुळे नीरा नदीमधील ७ टीएमसी पाणी उजनीमध्ये आणून मराठवाड्याला देण्यात येणार आहे. हे पाणी देत असताना उजनीच्या पाणी वापर पातळीपेक्षा पाच मीटर खाली भीमा-सीना बोगद्याचे काम सुरु आहे.

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा  व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची  जय्यत  तयारी सुरु केली आहे.मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील वातावरण ढवळून निघणार असून पाण्याचे राजकारण पेटणार आहे.

 विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येवू लागली आहे.तसतसे तालुक्यातील राजकारण पाण्यावरुन तापू लागली आहे. गेल्या महिन्यामध्ये नीरा डावा व खडकवासल्याच्या कालव्यावरुन आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती. आत्ता इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाने उजनीच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे मोर्चा वळवला असून दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी पुन्हा नीरा-भीमा व भीमा -सीना नदीच्या जोडप्रकल्पावरुन दोघे आमने सामने येणार आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार (ता.२२) रोजी पळसदेव मध्ये  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार (ता.२४) रोजी पळसदेवमध्ये  ठिय्या आंदोलन करण्याची जोरदार तयारी सुरु केली असून दोन्ही पक्षांनी इंदापूर तालुक्यातून मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध केला असुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडण्यास सुरवात केली आहे.पाण्यावरुन तालुक्यामध्ये राजकीय वातावरण हिवाळ्यामध्ये ही गरमागरम राहणार आहे. 

विरोध

 कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्यातील ७७.७२ टीएमसी अतिरिक्त पाणी नीरा नदीमध्ये आणण्यात येणार होते. यातील ६६.२७ टीएमसी पाणी नीरा नदीतुन नीरा-भीमा जोड जोडप्रकल्पाच्या बोगद्यातुन  उजनी धरणात सोडण्यात येणार होते. व यातील २१ टीएमसी पाणी भीमा-सीना नदी जोडप्रकल्पाच्या बोद्यातुन मराठवाड्याला देण्यात येणार होते. मात्र  कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाचे कामाला सुरवात झाली नसून याचे काम करण्यास  पाणी तंटा लवादाने मनाई केली आहे.

मात्र इंदापूर तालुक्यामध्ये  नीरा-भीमा व भीमा-सीना या बोगद्याची कामे वेगाने सुरु आहेत. यामुळे नीरा नदीमधील ७ टीएमसी पाणी उजनीमध्ये आणून मराठवाड्याला देण्यात येणार आहे. हे पाणी देत असताना उजनीच्या पाणी वापर पातळीपेक्षा पाच मीटर खाली भीमा-सीना बोगद्याचे काम सुरु असून भविष्यात ७ टीएमसीपेक्षा जास्त मराठवाड्याला जाणार असल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने इंदापूरचे पाणी मराठवाड्याला देण्यास भरणे व पाटील  विरोध करु लागले आहे.

संबंधित लेख