Indapur Grampanchyat Election Harshwardhan Patil and Dattatray Bharne | Sarkarnama

कोणता झेंडा घेऊ हाती? : इंदापूरात सरपंच, सदस्यांमध्ये संभ्रम

राजकुमार थोरात
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविता येत नाहीत. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांनीही नवनिर्वार्चित सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोघांचेही सत्कार स्वीकारणाऱ्या सरपंच व सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांपैकी कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती? असा प्रश्‍न पडला असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

वालचंदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविता येत नाहीत. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांनीही नवनिर्वार्चित सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोघांचेही सत्कार स्वीकारणाऱ्या सरपंच व सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांपैकी कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती? असा प्रश्‍न पडला असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

इंदापूर तालुक्‍याच्या राजकारणामध्ये आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये ग्रामपंचायत ते विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमीच चुरस असते. दोघेही एकमेकावर टीका करण्याची संधी दवडत नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यापासून आमदार दत्तात्रेय भरणे तालुक्‍यावर वर्चस्व प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार भरणे यांनी तालुक्‍यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदीव्रिकी संघावरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये तालुक्‍यातील सर्वार्धिक जागा जिंकून पक्षाला यश मिळवून दिले.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मारुन नगराध्यक्ष व सभापती पद काँग्रेसकडे खेचून आणले असून तालुक्‍यावर काँग्रेसचे वर्चस्व अबाधित असल्याचे सिद्ध केले. नुकत्याच तालुक्‍यामध्ये 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गावपातळीवरील राजकारण झाले. काही ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पॅनेल तयार करून निवडून आणले. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसल्यामुळे आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सरपंचपदाच्या आकड्यांवरुन चढाओढ सुरू झाली. दोघांनीही प्रत्येकी 17 ग्रामपंचायतीवर दावा केला.

या दोघांच्या दाव्यामध्ये नवनिर्वार्चित सरपंच व सदस्यांची मात्र पंचाईत झाली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार (ता.17) आमदार भरणे यांनी नवनिर्वार्चित सरपंच व ग्रामपंचात सदस्यांना बोलावून सत्कारसमारंभामध्ये आघाडी घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलावून त्यांचे सत्कार केले. हर्षवर्धन पाटील यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादी काँग्रेस व तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले होते. रविवार (ता.22) रोजी सत्कारसमारंभ कार्यक्रम पार पडला. यामध्ये आमदार भरणे यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचांचा पाटील यांनी सत्कार केला.

तालुक्‍यातील काही सरपंचांनी दोघांच्या ही कार्यक्रमाला उपस्थित न राहता सत्कारसमारंभाच्या आदल्या दिवशी व अनेक सरपंचांनी इंदापूर शहरामध्ये भरणे व पाटील यांची भेट घेऊन 'आम्ही तुमचेच' असल्याचे सांगून फोटो सेशन केले. 26 ग्रामपंचायतीपैकी 17 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचा दावा दोघांनाही केला असल्यामुळे नवनिर्वार्चित सरपंच व सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षापैकी कोणता झेंडा घ्यावयाचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अहो आम्ही तुमचेच आहोत ?
आमदार भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना 'अहो आम्ही तुमचेच' असल्याचे गंगावळण, झगडेवाडी, रेडणी, कुरवली, डाळज नंबर - 2 या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य सांगत आहेत.

 

 

संबंधित लेख