indapur election fever | Sarkarnama

इंदापुरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचे शीर्षासन होणार?.

राजकुमार थोरात
रविवार, 2 डिसेंबर 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मिसळण्याची एकही संधी आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सोडत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मिसळण्याची एकही संधी आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सोडत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दोघांनीही योग शिबिराला हजेरी लावून प्राणायम करीत करीत विविध आसने केली. मात्र खरे आसन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये होणार असून कोण - कोणाला शिर्षासन करायला लावणार याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागणार आहे.
    
विधानसभेच्या निवडणुकीला अकरा महिन्याचा कालावधी राहिला आहे. इंदापूरच्या जागेची चर्चा राज्यात सुरु असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  निवडणूकीसाठी तालुक्यातुन आमदार भरणे, माजी सहकारमंत्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने इच्छुक आहेत.

चौघांनी ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली अाहे. निवडणूकीवरती चौघांनी लक्ष केंद्रित करुन तालुक्यातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यावर भर दिला आहे. तालुक्यामधील नागरिकांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होण्याची एकही संधी चौघेजण सोडत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. इंदापूर शहरामध्ये पंतजली योग समितीच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत योगप्राणायम शिबीर सुरू आहे.

या शिबिराला हर्षवर्धन पाटील यांनी शनिवार (ता.१) रोजी हजेरी लावून योगप्राणायमाचा सराव करुन विविध आसने केली समोरच चहाच्या टपरीवरती  कार्यकर्त्यांच्या समवेत चहा पिण्याचा आनंद घेतला. आज रविवार (ता.२) रोजी आमदार  दत्तात्रेय भरणे यांनीही भल्या पहाटेच शिबिरीला हजेरी लावून योगप्राणाम व आसने केली. शिबीर संपल्यानंतर त्यांनीही कार्यकर्त्यासमवेत चहा पिवून कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत केला. एरवी सुसज्ज हॉटेलमध्ये चहा घेणारे आजी माजी आमदार  टपरीवरती चहा पित असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. जगदाळे व माने या दोघांनाही योगशिबिरासाठी निमंत्रणे दिली असून दोघे कधी हजेरी लावणार याकडे आयोजकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख