आमदारांनी राजकारणासाठी राजीनाम्याचे नाटक करू नये - इम्तियाज जलील

 आमदारांनी राजकारणासाठी राजीनाम्याचे नाटक करू नये - इम्तियाज जलील

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर भागात सुरू असलेले आमदारांचे राजीनामा सत्र हे नाटक आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष कुणाचेही राजीनामे स्वीकारणार नाहीत हे आधीच ठरले आहे. त्यामुळे उगाच आमदारांनी राजीनाम्याची नौटंकी करू नये असा टोला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना लगावला. 

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेले हिंसक आंदोलन, तरुणांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि आमदारांकडून दिले जाणारे राजीनामे यावर इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मराठा समाजाची जी अवस्था आहे ती या तीन-चार वर्षातच झाली आहे का ? तर नाही. या परिस्थितीला गेल्या 30-40 वर्षात मुख्यमंत्रीपद भोगलेले 11 मराठा पुढारी, अनेक मंत्री, कारखानदार, संस्थासंचालकच जबाबदार आहेत. सत्तेचा उपभोग घेतलेले मराठा समाजातील 8-10 टक्के नेते मोठे झाले पण समाज मागे राहिला. त्यामुळेच आज मराठा आरक्षणासाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्‍न त्यांना का सोडवता आला नाही. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका वर्षभरावर आलेल्या असतांना अचानक मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेतो, आमदार राजीनामा देतात यामागे केवळ राजकारण आहे. 

आमदारांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाही हे स्पष्टच असल्यामुळे एक एक करून राजीनामे दिले जात आहेत. त्या आमदारांना माझे आव्हान आहे, की मराठा समाजाच्या आजच्या परिस्थीतीला आम्हीच जबाबदार आहोत आणि त्यामुळे राजकारणा बाहेर राहून आम्ही भविष्यात समाजासाठी लढू, निवडणूक लढवणार नाही असे शपथपत्र लिहून द्यावे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या राजीनामापत्रात लिंगायत, मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी आरक्षणाचा उल्लेख केला होता. पण चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सभागृहात एकदा तरी या विषयावर तोंड उघडले होते का ? त्यामुळे हा सगळा प्रकार म्हणजे मी मारल्या सारखे करतो, तुम्ही रडल्या सारखे करा असाच आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केवळ मुस्लिमांची मते हवीत 
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मराठा नेते आमदार सभागृहात बोलतात तेव्हा फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात. मुस्लिम आरक्षणाचा विषय आला की मात्र ते 7-8 मुस्लिम आमदारांना पुढे ढकलतात. यावरून एकच स्पष्ट होते की त्यांना फक्त मुस्लिमांची मत हवी असतात. प्रश्‍न मांडायची वेळ आली की मात्र ते मुस्लिमांना वाऱ्यावर सोडतात. धनगर, मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी आहे म्हणून त्यांचे प्रश्‍न इतर लोकप्रतिनिधी सभागृहात मांडत नाहीत. मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले आहे. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याचा तर मार्ग मोकळा आहे. तरी ते आम्हाला मिळावे म्हणून एकही मराठा किंवा इतर आमदार सभागृहात तोंड उघडत नसल्याची टिका इम्तियाज यांनी केली. 

मराठा तरूणांनो लढा, जीव देऊ नका 
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी तरुणांनी आपले प्राण गमावणे योग्य नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवतो ते लढवय्ये होते. त्यामुळे मराठा तरुणांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा, जीव देऊ नये असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com