Imtiaz Jaleel Says Congress Should Watch Public Meeting of Ambedkar Oweisi | Sarkarnama

आंबेडकर-ओवैसींची सभा काँग्रेसने चोरून का होईना पहावीच - इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

महिनाभरापासून चर्चा सुरू असलेली प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची एकत्रित जाहीर सभा आणि बहुजन वंचित-एमआयएम आघाडीची अधिकृत घोषणा दोन ऑक्‍टोबरच्या जाहीर सभेत होणार आहे. औरंगाबादच्या बीडबापास रोडवरील मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

औरंगाबादः एमआयएम काँग्रेसकडे आम्हाला आघाडीत घ्या म्हणून म्हणायला गेलीच नव्हती. भारिप बहुजन वंचित आघाडी व एमआयएम एकत्र येणार या धास्तीने भल्याभल्यांना धडकी भरली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना माझे जाहीर आव्हान आहे, की उद्याची प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा त्यांनी चोरून लपून का होईना पहावीच, असे प्रतिपादन एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले. 

भारिप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची बुधवारी (ता.2) औरंगाबादेत होणारी संयुक्त सभा येत्या काळात राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवणारी तसेच भूंकप घडवणारी ठरणार असल्याचा दावाही इम्तियाज जलील यांनी केला. 

महिनाभरापासून चर्चा सुरू असलेली प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची एकत्रित जाहीर सभा आणि बहुजन वंचित-एमआयएम आघाडीची अधिकृत घोषणा दोन ऑक्‍टोबरच्या जाहीर सभेत होणार आहे. औरंगाबादच्या बीडबापास रोडवरील मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

या संदर्भात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "या सभेला किती गर्दी होईल याचा अंदाज लावणे अजूनही आम्हाला शक्‍य झालेले नाही. सातत्याने दुर्लक्षित असलेला आणि केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला गेलेला मुस्लिम आणि दलित समाज एकत्र येणार म्हटल्यावर या दोन्ही समाजामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. उद्याच्या सभेसाठी भारिप व एमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत. मराठवाडाच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून सभेसाठी कसे यायचे, कुठे यायचे, पार्किंगची व्यवस्था काय हे विचारणारे शेकडो फोन येत आहेत. एका जिल्ह्यातील तीनशे ते कमीत कमी पन्नास वाहने या सभेला येणार आहेत. सभेला येणाऱ्यांच्या निश्‍चित आकडा व त्या दृष्टीने व्यवस्था करण्यासाठी आम्ही आजच पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे,"

प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसशी आघाडी बोलणी केली, त्यात एमआयएमला देखील सहभागी करून घ्यावे असा आग्रह धरला होता. मात्र काँग्रेसने त्याला नकार दिल्याची चर्चा होती. याचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी काँग्रेस व प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. 

दोन्ही नेत्यांमध्ये होणार गुप्त बैठक
उद्याच्या संयुक्त सभेसाठी प्रकाश आंबेडकर आज सांयकाळीच शहरात दाखल होणार आहेत. तर खासदार ओवेसी हे उद्या सकाळी येणार आहेत. सभेला संबोधित करण्याआधी या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक होणार असल्याची माहिती देखील इम्तियाज जलील यांनी दिली. पण या बैठकीचे ठिकाण सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

सध्या प्रचंड उकाडा असल्यामुळे भर दुपारी होणाऱ्या या सभेवर काही परिणाम होईल का? असे विचारले असता इम्तियाज जलील म्हणाले, ''याचा विचार आम्ही केला होता. प्रकाश आंबेडकरांशी देखील या संदर्भात बोललो, पण दलित आणि मुस्लिम समाज हा काबाड-कष्ट करणारा आणि ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगाणारा आहे. त्यामुळे त्यांच्यावर उन्हाचा काही परिणाम होणार नाही असे सांगत सभा घेण्याच्या सूचना केल्या." 

संबंधित लेख