Imtiaz Jaleel says the attackers are free and the victim | Sarkarnama

इम्तियाज जलील म्हणतात ,मार खाणारा तुरूंगात, मारणारे मोकाट हा कुठला न्याय ?

सरकारनामा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत पोलीसांनी ही कारवाई केली आहे. मतीन याची स्थानबध्दता आणि पोलीसांच्या दंडेलशाही विरोधात आम्ही सगळ्या पुराव्यानिशी कोर्टात जाणार आहोत. मतीनला देखील सर्वप्रकारची कायदेशीर मदत पक्षाकडून केली जाणार आहे.

-इम्तियाज जलील 

औरंगाबादः सय्यद मतीनवर महापालिकेच्या सभागृहात तुटून पडलेले भाजपचे नगरसेवक दिमाखाने मिरवतायेत, आणि ज्याला मारहाण झाली त्या मतीनला तुरूंगात टाकले जाते हा कुठला न्याय आहे ?  असा संतप्त सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

मतीनला आवश्‍यक ती कायदेशीर मदत तर आम्ही करणारच आहोत, पण पक्षपातीपणा करणाऱ्या पोलीसांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा दम देखील इम्तियाज जलील यांनी दिला. 

महापालिकेच्या सभागृहात देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध दर्शवला होता. यावर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात मतीनला बेदम मारहाण केली, तर महापालिके बाहेर मतीनच्या समर्थकांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडत चालकाला रक्तबंबाळ केले होते. 

या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सय्यद मतीन याला औरंगाबाद पोलीसांनी एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. विविध प्रकरणी 9 गुन्हे दाखल असलेल्या मतीनवर एमपीडीए  कायद्याअतंर्गत  स्थानबध्दतेची कारवाई झाल्याने एमआयएममध्ये खळबळ उडाली आहे. 

या संदर्भात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना तिखट प्रतिक्रिया दिली. भाजपच्या ज्या नगरसेवकांनी सय्यद मतीन याला सभागृहात लाथाबुक्‍यांनी तुडवले, फरफटत नेले त्यांना पोलीसांनी काही तासात सोडून दिले. आणि मार खाणाऱ्या मतीनला मात्र एक वर्षासाठी स्थानबध्द केले हा अन्याय आहे. 

 

संबंधित लेख