इम्रान मेहंदीला पळवून नेण्याचा कट फसला, सात शार्पशूटरांना अटक
औरंगाबाद : कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयात इम्रान मेहंदीला जेव्हा आणण्यात येईल तेव्हा पोलिसांच्या गाडीवर फायरिंग करत त्याला पळवून नेण्यात येणार होते. पण सतर्क असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा कट उधळून लावत मध्यप्रदेशातून शहरात दाखल झालेल्या सात शार्पशूटरसह मेहंदी गॅंगमधील दोघांना पिस्तूल व काडतुसांसह अटक केली. सोमवारी ( ता.27) सकाळी नऊ वाजता नारेगाव भागात ही कारवाई करण्यात आली. यातील एकजण पिस्तूल घेऊन पसार झाला.
औरंगाबाद : कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयात इम्रान मेहंदीला जेव्हा आणण्यात येईल तेव्हा पोलिसांच्या गाडीवर फायरिंग करत त्याला पळवून नेण्यात येणार होते. पण सतर्क असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा कट उधळून लावत मध्यप्रदेशातून शहरात दाखल झालेल्या सात शार्पशूटरसह मेहंदी गॅंगमधील दोघांना पिस्तूल व काडतुसांसह अटक केली. सोमवारी ( ता.27) सकाळी नऊ वाजता नारेगाव भागात ही कारवाई करण्यात आली. यातील एकजण पिस्तूल घेऊन पसार झाला. मेहंदीला न्यायालयात नेताना किंवा परत आणताना सोडवून नेण्याचा या टोळीचा प्रयत्न होता.
माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या खूनप्रकरणात कुख्यात इम्रान मेहंदी याच्या शिक्षेबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. न्यायालयात सुनावणीला नेताना अथवा परत कारागृहात नेताना पोलिसांवर हल्ला करुन त्याला सोडवून नेण्याचा डाव आखण्यात आल्याची गोपनिय माहिती विशेष शाखा तसेच गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानूसार अत्यंत सावधानता बाळगत पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली होती . एकिकडे मेहंदीला न्यायालयात नेण्याच्या हालचाली सूरू होत्या, तर दुसरीकडे गुन्हेशाखेने गरवारे स्टेडीयम ते नारेगाव भागात सापळा रचला. मध्यप्रदेशची एक तवेरा गाडी व दोन दुचाकीस्वार मेहंदीच्या कारागृहातून बाहेर पडण्याची वाट पाहत होते.
कारागृहातून बाहेर पडण्यापूर्वीच गुन्हेशाखेच्या पथकाने एकूण नऊजणांना नारेगाव चौक गरवारे स्टेडीयम येथून उचलले. यात मध्यप्रदेशातून आलेल्या सात शार्पशूटरचा तसेच मेहंदी गॅंगमधील दोघांचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना अटक करून त्यांच्याकडून तवेरा गाडी, दोन दूचाकी, एक पिस्तूल, आठ जिवंत काडतूसं तसेच एक वापरलेले रिकामे काडतूस आणि मोबाईल जप्त केला. दरम्यान मध्यप्रदेशातून आलेल्या व स्थानिक गॅंगच्या पाच जणांनी हर्सूल कारागृहाची सुनावणीआधी काही दिवसांपुर्वी रेकी केली होती. हर्सूल परिसरात फायरिंगचा सरावही शार्पशूटर्सनी केला होता अशी माहिती गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीसांनी अटक केलेले सातही आरोपी रेकार्डवरील असून चोरी, खून, हत्यार बाळगणे, धमकावणे आदी गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता अशी माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधूकर सावंत यांनी दिली.