Imran khan gained Pak Prime minister's post by using high technology and data collection | Sarkarnama

मोबाईल ऍप आणि  5 कोटी मतदारांच्या डेटाने इम्रानखान यांना दिले पाकिस्तानचे पंतप्रधानपद 

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नव्या तंत्राचा वापर परिणामकारक ठरला. सीएमएससाठी मतदारसंघनिहाय पथके स्थापन करण्यात आली. प्रचारमोहिमेच्या काळात कार्यकर्त्यांना जी गोष्ट करण्यासाठी काही दिवस खर्च करावे लागत होते, तीच बाब सीएमएसच्या माध्यमातून एक ते दोन तासांत करणे शक्‍य झाले.
- अमीर मुघल, 'पीटीआय'चे नेते असाद उमर यांचे सचिव

इस्लामाबाद:  पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशात मोबाईल फोन ऍप आणि पाच कोटींहून अधिक मतदारांचा एकत्र केलेला डेटा यांनी कळीची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचार मोहिमेत तंत्रज्ञानाचा नेमका कशा प्रकारे वापर करण्यात आला, ही बाब गुप्त ठेवणे खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने पसंत केले आहे. मात्र, आता त्यातील काही बाबी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत.

पक्षाच्या समर्थकांचा डेटा आणि मोबाईल ऍपने पीटीआयला विजयाच्या जवळ पोचवल्याचे दिसून येते. प्रचार मोहीम सुरू होण्यापूर्वीच पक्षाने आपल्या समर्थकांची खडान्‌खडा माहिती गोळा करण्यावर भर दिला होता. पीटीआयने सुमारे पाच कोटी मतदारांच्या माहितीला मोबाईल ऍपची जोड दिली. पारंपरिक निवडणूक प्रचाराबरोबरच पीटीआयने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही जवळ केले.
मतदारसंघ व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस) असे या यंत्रणेचे नामकरण करण्यात आले होते. स्वतः खान यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना सीएमएसचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले होते.

 हायटेक मतदारसंघ व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस)    
- पीटीआयने सुरवातीला मतदारसंघानिहाय माहिती संकलित केली
- त्यातून पीटीआयच्या समर्थकांची यादी तयार केली
- समर्थकांची सर्व माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक सीएमएसशी संलग्न करून मतदारांशी थेट संपर्क
- निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी हे मोबाईल ऍप फायद्याचे ठरले
- सीएमएसचा 2015च्या निवडणुकीत पीटीआयकडून प्रायोगित तत्त्वावर वापर

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख