if u talked these good things before i could had win the election | Sarkarnama

`मागच्या निवडणुकीत इतकं चागलं बोलला असता तर मी निवडून आलो असतो....`

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुरंदर तालुक्यातील सासवड इतके सांस्कृतिक कार्यक्रम पुण्याच्या ग्रामीण भागात कोठेच होत नसावेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने वक्त्यांची जुगलबंदी नेहमीच रंगते. अशा कार्यक्रमांत येथील नेतेही चौफेर फटकेबाजी करत असतात. आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात रंगलेल्या किश्श्यांचा हा वृत्तांत

सासवड (ता. पुरंदर) : येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त तथा झिरो पेंडन्सीचे प्रणेते चंद्रकांत दळवी हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी विजय कोलते अध्यक्षस्थानी होते.

पोलिस उपनिरीक्षक झालेला आशिष पवार या वेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाला की मी गरीब कुटुंबातील आहे. आईवडील शेती करतात. मी नोकरीत असताना माझे पाय नेहमीच जमिनीवर राहतील. मात्र यानंतर बोलताना जेष्ठ नेते नारायणभाऊ निगडे म्हणाले कि., ``आरे बाबा, आता तू छान बोलतोय. पण एकदा कमरेला रिव्हालवर आलं ना तर फरक होतो. पण तो फरक तू होऊ देऊ नको.`` त्यांच्या या सल्ल्याने अनेकांना अंतर्मुख केले. 

सत्काराला उत्तर देताना शिक्षक पुरस्काराचे मानकरी सोपान जगदाळे यांनी कोलते यांची आठवण सांगितली. ``मी नोकरीला लागलो, तेंव्हा विजय कोलते पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. मी जिल्ह्यात कुठेतरी जाऊन पडलो असतो, मात्र विनंती केल्यावर कोलते साहेबांनी मला सोयीच्या ठिकाणी सोयीच्या गावांत अगदी माझ्या घरापासून जवळच नेमणूक दिली. विशेष म्हणज कशाचीही (?) अपेक्षा केली नाही. अशा व्यक्ती नेहमीच पदावर असाव्यात म्हणूनच कोलतेसाहेब माझे आदरस्थान आहे.. हे आज अगदी मनापासून बोलतो.`` 

विजय कोलते बोलताना जगदाळेंचा हा धागा पकडून म्हणाले., ``अहो जगदाळे गुरुजी, माझ्या मागच्या निवडणुकीत इतकं चांगलं बोलला असता, तर मी निवडून आलो असतो. पण आता बोलून काय उपयोग ?`` (हशा)

नायब तहसीलदारपदी निवड झालेले विपुल निवृत्ती ढुमे यांनी चांगले विचार मांडले. त्यांच्याही भाषणाचा संदर्भ घेऊन श्री कोलते म्हणाले कि., ``माजी आयुक्त दळवी साहेबांसमोर मी बोलतोय. तरी सांगतो. नायब तहसीलदारांना तहसीलदाराइतकेच महत्व आहे. मला जर कोणी प्रश्न विचारला की तहसीलदार मोठे की नायब तहसीलदार? तर मी उत्तर देईन, नायब तहसीलदार हेच मोठे ! कारण? माझी मुलगी नायब तहसीलदार आहे. बापलेकीचं तेवढंच समाधान! बाकी काय आहे?`` त्यांच्या या स्पष्टिकरणालाही हसून दाद मिळाली.  

हा किस्सा सांगून कोलतेंनी सभागृहात हशा अन् टाळ्या वसूलच केल्या. चहापानाच्या वेळी पुन्हा माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी  नायब तहसीलदारांना मोठे केल्याचा किस्सा आवडल्याचं आवर्जून श्री. कोलते यांना सांगितलं. 

या सत्कार सोहळ्यातील भाषणात बोलताना दळवी म्हणाले, ``खरे तर गावांत सामाजिक काम उभे करताना बाहेर गावी असलेले लोक सहजपणे सापडत नाहीत. मी आयुक्तपदी असतानाही निढळ गावांतील काम पुढे नेण्यासाठी अगदी धारावीच्या झोपडपट्टीतही जाऊन गाववाल्यांची आर्थिक मदत मिळविली. हात मागे घेणारेही लोक मी दारात आलोय म्हंटल्यावर शंभर - दोनशे रुपयांपर्यंतची मदत देत होते. मला गाव साऱया अर्थाने एक करायचे होते, त्यामुळे एवढी धडपड केली.`` दळवींच्या या कष्टांचे कौतुकही उपस्थितांनी तेथे केले.

संबंधित लेख