शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्राची सरकारने दखल घेतली असती, तर कोरेगाव भीमा दंगल टळली असती : आमदार जितेंद्र आव्हाड
गेल्या वर्षी कोरेगाव भीमाची दंगल होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून काहीतरी अनुचित घडण्याची शंका व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची योग्य दखल घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर कोरेगाव भीमाची दंगल टळली असती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज नागपुरात केला.
नागपूर : गेल्या वर्षी कोरेगाव भीमाची दंगल होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून काहीतरी अनुचित घडण्याची शंका व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची योग्य दखल घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर कोरेगाव भीमाची दंगल टळली असती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज नागपुरात केला.
संविधान जागर परिषदेसाठी आमदार जितेंद्र आव्हाड नागपुरात आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, की जानेवारीत महिन्यात कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. दंगल घडविण्यासाठी काहीजण या ठिकाणी काही दिवसांपासून सतत प्रयत्न करीत होते. याची शंका अनेकांना आली होती. यामुळेच शरद पवार यांनी राज्य सरकारला या दंगलीपूर्वी राज्य सरकारला एक पत्र पाठविले होते. यात कोरेगाव भीमामध्ये काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती या पत्रात व्यक्त केली होती. या पत्राची मुख्यमंत्र्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. राज्य सरकारने या पत्राची दखल का घेतली नाही? जे अन्य नागरिकांना कळते ते राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाला कळले नाही काय? असा सवाल आमदार आव्हाड यांनी केला.
या दंगलप्रकरणी एकाही पोलिसांवर राज्य सरकारने कारवाई केली नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे सांगून आमदार आव्हाड म्हणाले, की कोरेगाव भीमा हे शौर्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी शौर्याला अभिवादन करण्यासाठी लोक जातात.
संजलीची हत्या निर्भयासारखीच
उत्तरप्रदेशमध्ये संजली या युवतीची झालेली हत्या ही निर्भयाची पुनरावृत्ती होती. परंतु देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला. आता हत्येची दखलही जात व स्थानावरून घेतली जाईल काय? संजलीच्या हत्येबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी खेद किंवा दुःख व्यक्त केले नाही, असेही आमदार आव्हाड यांनी सांगितले.