If alliance not done Bjp will have to fight hard in North Mumbai | Sarkarnama

उत्तर मुंबई लोकसभा - युती न झाल्यास भाजपला झगडावं लागणार

कृष्ण जोशी
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

काही अपवाद वगळता इथला मतदार भाजपला साथ देत राहिला आहे. कॉंग्रेसचे भलेभले नेतेही येथून उमेदवारीसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळेच सध्या भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे पारडे जड आहे; मात्र शिवसेना-भाजपची युती फिस्कटलीच तर भाजपला वर्चस्व राखताना झगडावे लागेल. त्यामुळे कदाचित मतदारसंघातील चित्रही बदलू शकते.

मुंबई - समाजवादी कार्यकर्त्या मृणाल गोरे यांनी एकेकाळी खासदारपद भूषवलेल्या या मतदारसंघावर सध्या भाजपची पकड आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिंकिंग रोडच्या विस्तारासह मच्छीमार, आदिवासी समाजासह सर्वांची कामे केली. मतदारसंघात उद्यानांच्या निर्मितीतही त्यांनी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे, तर मतदारसंघाबाहेरही कामे करण्याची धडपड त्यांनी केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे. युती झाली तर शेट्टी यांचे पारडे जडच राहील; पण झाली नाही तर 2009 मधील निवडणुकीप्रमाणे "दोघांच्या भांडणात कॉंग्रेसला लाभ' असे चित्र दिसू शकते.

अर्थात, तो फायदा घेण्यासाठी कॉंग्रेसला येथे सक्षम उमेदवार हवाय. 2009 मध्ये मनसेमुळे मतविभागणी झाल्याने भाजपचे राम नाईकांसारखे मातब्बर उमेदवारही पराभूत झाले होते. 2014 मध्ये मात्र मनसेचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

उत्तर मुंबईत बोरिवलीसह चार आमदार भाजपचे, तर शिवसेनेचा आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. मागठाणे व दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची, तर मालाडमध्ये कॉंग्रेसची पकड आहे. कॉंग्रेसचे संजय निरुपम, कृपाशंकर सिंह आदी बलाढ्य नेतेही उत्तर मुंबईतून लढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. भाजपचे मोहित कंबोज, प्रवीण दरेकर येथून इच्छुक असले तरी गोपाळ शेट्टी यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, असे दिसते. युती फिस्कटलीच तर शिवसेनेतर्फे विनोद घोसाळकर रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे भाजपला थोडे जण शक्‍यता आहे. "आप', समाजवादी पक्ष आणि "एमआयएम'सारख्या पक्षांचा मात्र येथे तितका प्रभाव नाही. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे दुरंगी लढत अपेक्षित आहे.

2014 चे मतविभाजन
- गोपाळ शेट्टी (भाजप)- सहा लाख 64 हजार चार
- संजय निरुपम (कॉंग्रेस)- दोन लाख 17 हजार 422
- सतीश जैन (आप)- 32 हजार 364

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
- भाजप- गोपाळ शेट्टी, मोहित कंबोज, प्रवीण दरेकर
- शिवसेना- विनोद घोसाळकर
- कॉंग्रेस- अस्लम शेख
- मनसे- शालिनी ठाकरे

मतदारांतील नाराजीची कारणे
- गोरेगाव टर्मिनसपुढे हार्बर रेल्वेमार्गाचा विस्तार रखडला
- राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींसह अन्य रहिवाशांना सक्तीने स्थलांतरांची भीती
- पश्‍चिम खाडीपट्ट्यातील तिवरांच्या जंगलावर होणारी अतिक्रमणे
- मच्छीमार समाजाचे प्रलंबित राहिलेले काही प्रश्‍न
- मेट्रोच्या कामामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व लिंक रोडवरील वाहतूक कोंडी

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख