I will remain as CM : Fadnvis | Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणून मीच राहणार; दानवेही जाणार नाहीत : फडणवीस 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रूप धारण केले. मी दिल्लीला जाणार नसून दानवे यांचेही प्रदेशाध्यक्षपद जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात बोलणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली. राज्यात शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अराजक माजविण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई : ""बातम्या कमी पडल्या म्हणून मिडिया भाजपमध्ये बदल घडणार असल्याचे दाखवत असतात. पण मी महाराष्ट्रातच मुख्यमंत्री म्हणून राहणार असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही बदलले जाणार नाहीत,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बोरीवली येथील बैठकीत ते बोलत होते. "आपल्यात विसंवाद असेल तरच मिडियाची दुकानदारी चालू राहते, असे वाक्‍य उच्चारत त्यांनी भाजपबद्दल खोट्या बातम्या दिल्या जात असल्याचा सूर लावला. 

"आता हेच पाहाना! प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. प्रत्यक्षात असे काहीच होणार नाही. असे निर्णय या बैठकांत होत नाही, हे सर्वांना माहिती आहे. तरीही अशा बातम्या देण्यात आल्या. मी मिडियाला स्पष्टपणे सांगतो की मी महाराष्ट्रातच राहणार आहे. दिल्लीत जाणार नाही. त्यामुळे ही बातमी आता दाखवू नका. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने राज्यात दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांना देखील बदलले जाणार नाही,'' असे त्यांनी सांगितले. मात्र मिडियाला बातम्या कमी पडत असतील त्यांनी या बातम्यांचा एखादा स्लॉट दाखवावा, अशी टीप्पणी त्यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार देशात सक्षमपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारबद्दलची प्रतिमा काय रूजते आहे, यावर आपल्याला आता काम करावे लागेल. मिडिया आपल्या विरोधात चुकीच्या बातम्या दाखवत आहे. ही प्रतिमा आपण बदलली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर त्याविषयी संशय केला जातो. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाविषयी आम्हाला विचारले जाते. पण हा आयोग कोणी नेमला? तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार होते. त्या वेळी त्यांना हा आयोग आठवला नाही? तेव्हा तुमच्या तोंडात काय घुसवलं होतं? तेव्हा तुम्हाला आवाज का फुटला नाही?, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 

विरोधकांच्या आंदोलनाची खिल्ली त्यांनी उडवली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाजपच्या मंत्र्यांना झेंडा फडकवू न देण्याचे आंदोलन करण्याची भूमिका म्हणजे देशद्रोहाची भूमिका आहे. या देशात अराजक माजविण्याचा कम्युनिस्टांचा डाव आहे. या आंदोलनामागे कम्युनिस्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशात शेतकऱ्यांसाठी सव्वा लाख कोटी रूपयांची कर्जमाफी करणे कसे शक्‍य आहे? या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी द्यावे. शेतकऱ्यांचा विश्‍वास भाजप सरकारवर आहे. त्यामुळे विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.  

संबंधित लेख