मी काही थांबणार नाय आणि समोरचा गडी तुम्हाला ऐकणार नाय : आमदार पाचर्णेंची बॅटिंग

मी काही थांबणार नाय आणि समोरचा गडी तुम्हाला ऐकणार नाय : आमदार पाचर्णेंची बॅटिंग

शिक्रापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून कोण, हे ठरलेले नसले तरी `मी गडी थांबणारा नाही, असे सांगत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी काल शिक्रापूरात थेटपणे आपली उमेदवारी जाहीर करुन टाकली.

शिक्रापूर येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने सरपंच रामभाऊ सासवडे यांनी शनिवारी (दि.२७) पालकमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, कंद व बांदल असे सगळ्यांनाच एका व्यासपीठावर आणले. कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि राजकीय जुगलबंदी सुरू झाली.

राज्यभर भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करुन राज्य गाजविणारे माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे व्यासपीठावर आले आणि त्यांनी बापट यांच्या कानात गुजगोष्टी करीत स्मित हास्य केले आणि विकासकामांच्या उद्घाटनाला शुभेच्छा देत लगेच जाणे पसंत केले.

कार्यक्रम रंगू लागला तो पैलवान मंगलदास बांदल यांच्या भाषणाने. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या राजकारणाने केली. या इमारतीला तत्कालीन आमदार अशोक पवार यांनी विरोध केल्याचे सांगत त्यांनी इमारत पूर्ण करण्यासाठी पाच फुटी काळी बाहुली लटकवल्याने इमारत पूर्ण झाल्याचे सांगितले.

प्रत्येक निवडणुकीत एवढीच पाच वर्षे म्हणत आमदार पाचर्णे आता आणखी पुढची पाचही माझीच म्हणतात, अशी गोड तक्रार यावेळीही तालुका त्यांनाच आमदार करणार असल्याचे बांदल यांनी सांगून टाकले. पण ते तेवढ्यावरच न थांबता शेजारी बसलेल्या प्रदीप कंदांनाही विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा देऊन बांदल यांनी गुगली टाकली. हे सांगताना बांदलांनी आपलाही पत्ता ओपन केला आणि आगामी लोकसभेसाठी शिक्रापूरला संधी द्या संधीचं सोन करुन दाखवू, असे म्हणत बापटांसह सगळ्यांकडून टाळ्या वसूल केल्या.
 
नंतर उभे रहिले ते प्रदीप कंद. त्यांनी थेटच पाचर्णेंकडे पाहतच बोलायला सुरवात केली आणि सांगितले की, पाचर्णेंनी विधानसभेच्या पाच निवडणूका लढविल्या, अशोक पवारांनी दोन लढविल्या तर पैलवान बांदलांनी एक. मात्र मी एकही निवडणूक लढविली नसताना मी मतदारसंघाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरभरुन दिले आहे. त्यामुळे आता मी मागायला आलो की, तुम्ही कुणीच मध्ये पडू नका, असे सांगत आपण विधानसभेसाठी उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. 

याला आता पाचर्णे काय उत्तर देणार, याची उत्सुकता यामुळे निर्माण झाली. केलेल्या कामाचा आढावा, भाजपा सरकारचा कारभार आणि मोदी-फडणवीसांची दूरदृष्टी याची माहिती देत थेट आपल्या २०१९ च्या निवडणुकीबद्दल त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की मी पाच निवडणुका लढविल्या. पण सतत लोकांमध्ये राहून. दररोज दिवसाची सुरवात दशक्रिया विधींनी करणारा मी आमदार रात्री लोकांच्या सुखदु:खात मदत करताकरता झोपतो. त्यामुळे लोक मला साथ देतात. मात्र तुम्ही मला काहीही म्हणा,  मी गडी आता थांबणार नाय. कारण समोरचा गडी तुम्हाला ऐकणार नाय,` असे म्हणताच जोरदार टाळ्यांची बरसात झाली. अर्थात `समोरचा गडी` म्हणजे अशोक पवार असणार, हे अनेकांनी गृहित धरले. बापटही पाचर्णेंच्या हजरजबाबी उत्तरावर खूष झाले. त्यांनी पाचर्णेंची पाठ थोपटून आपल्या भाषणाला सुरवात केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com