i will not fight loksabha from pune or sangli : prithviraj chavhan | Sarkarnama

कोण म्हणतं मी पुणे, सांगलीमधून उभारणार? : पृथ्वीराज चव्हाण 

हरी तुगावकर
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर जनतेच्या समोर जावूच शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी मंदिराचा मुद्दा, आमच्या आघाडीत फूट कशी पाडली जाईल याचा प्रयत्न करेल इतकेच नव्हे तर समाजात हल्ले घडवून आणेल.

-पृथ्वीराज चव्हाण

लातूर : पुणे, सांगली येथून मी लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा केली जात आहे. त्या केवळ अफवा आहेत. मी दक्षिण कराडमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, 'राफेल'मधील भ्रष्टाचाराचे वातावरण तापू लागल्याने सीबीआयचे नाट्य घडवून आणण्यात आले आहे. सीबीआयचे संचालक व विशेष संचालकात सुरु असलेला प्रकारात श्री. मोदींनी कायद्याला मोडून हस्तक्षेप केला. त्यांना कशाची भिती वाटत आहे. राफेलमधील भ्रष्टाचार हा निवडणूकीचा मुद्दा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. चव्हाण म्हणाले, आघाडी, महाआघाडी होईल. तसे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान कोण होणार हा आमच्या समोर प्रश्न नाही. मोदी सरकारला पाडणे हे आमचे उद्दीष्ट आहे. विरोधकांच्या जागा जास्त आल्यानंतर सर्व बसून पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकार विकासाचा अजेंडा घेवून जनतेसमोर येणार नाही. केवळ भूलथापा देण्याचेच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आमची आघाडी कशी होणार नाही, त्यात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मंदिराचा मुद्दा पुन्हा समोर आणतील. इतकेच नव्हे तर हल्ले घडवून आणतील असा आरोपही श्री. चव्हाण यांनी यावेळी केला. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, मोईज शेख, एस. आर. देशमुख, दीपक सूळ उपस्थित होते.

 
 

संबंधित लेख