I will not contest lok sabha , vidhan sabha or graduate constituency : Chandrakant patil | Sarkarnama

लोकसभा, विधानसभाच काय पदवीधरचीही निवडणूक लढविणार नाही : चंद्रकांत पाटील 

सुनील पाटील 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

खर काय? 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विधानसभा, लोकसभा किंवा पदवीधरचीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी खर काय? दादा असा मध्ये प्रश्‍न विचारला. यावर सभागृहात हशा पिकला. यावर पदवीधरची निवडणूक लढविण्यासाठी तुमच्या पैकी कोण तयार आहे का?असा श्री पाटील यांनी उलट प्रश्‍न केला. त्यानंतर सभागृहातील हशा आणखी वाढला. 

कोल्हापूर  : "भविष्यात आपण लोकसभा, विधानसभाच काय पण पदवीधरमधूनही निवडणूक लढवणार नाही", अशी घोषणा महसूल मंत्री आणि कोल्हापूर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली.

केशवराव भोसले नाटयगृहात जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित गणराया ऍवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. दरम्यान, कार्यक्रमानंतर निवडणूक का लढविणार नाहीत हे जाणून घेण्यासाठी श्री पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र आता आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगून श्री पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, " गेल्यावर्षी डॉल्बीमुक्त कोल्हापूरसाठी कोल्हापूरातच थळ ठोकला होता. शहरात मंगलमयरित्या गणेश उत्सव व्हावा यासाठी आपला पोटतिडकीचा प्रयत्न होता. काही मंडळांमध्ये डॉल्बी लावण्याबाबत दुमत होते. पण, गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावू नये, हा माझा राजकीय अजेंडा नाही. केवळ शहरातील अबाल वृध्दांसह बालक आणि महिलांना पारंपारिक पध्दतीच्या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठीच धडपड होती. पारंपरिक वाद्याचा आग्रह धरला म्हणून मला त्यांच्याकडून दहा टक्के कमिशन मिळत नाही. "

" गतवर्षी कोल्हापुरातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये लावावीत याबाबत मी अनेक मंडळांना भेटलो व त्यांचे प्रबोधन केले. या विधायक उपक्रमाचा सर्वत्र चांगला संदेश गेला. मात्र यामुळे काही मंडळे दुखावली गेली. गेल्यावर्षी काही निवडणूका नव्हत्या. साउंड सिस्टीम न लावणे हा काही माझा राजकीय अजेंडा नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व सण-उत्सवात नागरिकांचा आनंद द्विगणित व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे." 

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, " लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने एकमेकांना विश्‍वासात घेवून काम केले पाहिजे. मी जनतेमधून निवडून आलेला आमदार आहे. जनतेचा आवाज ऐकणे आणि तो प्रशासनापर्यंत पोहचवणे हा आमचा हक्क आहे. दोन वर्षापूर्वी लोकांच्या कामासाठी किंवा डॉक्‍टरांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी मदतीच्या भावनेने केलेल्या कामाला   खंडणीचे स्वरूप दिले."

"  त्यानंतर गेल्यावर्षी गणेशोत्सव पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने माझ्या पी. ए. वर गुन्हा नोंद केला. आम्ही थरावर थर रचून डॉल्बी लावा अस म्हणत नाही. त्याचे समर्थनही करत नाही. कायदा मोडणाऱयांची  मी कधीच पाठराखण करणार नाही. मात्र प्रशासनाने जनतेचा, मंडळांचा आवाजही ओळखणे गरजेचे आहे," असे आवाहनी श्री क्षीरसागर यांनी केले. 
 

संबंधित लेख