I will fight Loksabha if party orders me : Shivraj Patil Chakurkar | Sarkarnama

राजकारणात निवृत्तीचे वय नसते , पक्षाने आदेश दिल्यास पुन्हा लढू : चाकूरकर 

हरी तुगावकर
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

" राजकारणात निवृत्तीचे वय नसते.चालता येते, बोलता येते, काम करता येते तो पर्यंत राजकारणात काम केले पाहिजे. पण ते आपल्या मनावर नसते. लोकच आपल्याला निवृत्त करीत असतात," असे ते म्हणाले.

लातूर: "मला काँग्रेसने भरपूर दिले आहे. १९६७ ते २०१५ पर्यंत मी सत्तेत राहिलो. मी कधीच काही मागितले नाही. मला ते मिळत गेले. आता अपेक्षा ठेवणे बरोबर नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास मात्र निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक लढवली नाही तर चांगल्या काळात निवडणूक लढवली अन परिस्थिती चांगली नाही अशा काळात मात्र पळून गेले असे बोलले जाईल," असे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आज सोशल मिडिआ प्रभावी ठरत आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. देशाचे राजकारण आतापर्यंत मध्यम मार्गाने चालत आले आहे. गौतम बुद्ध, महावीर, वेद उपनिषधांनी देखील मध्यम मार्गच सांगितला
आहे. पण सिनेमात जसे स्टंटला महत्व असते तसे काहीशी परिस्थिती आज राजकारणात झाली आहे, असे ते म्हणाले.

" देशात बोफोर्सचा विषय मोठा चर्चिला गेला. सभागृहाने चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. सर्वच ठिकाणी दिवंगत राजीव गांधी यांना क्लिन चिट मिळाली. कारगिलचे युद्ध याच बोफोर्स मुळे जिंकता आले. पण बोफोर्सचे नाव मात्र घेतले
जात नाही. आत राफेल विमान खरेदीचा विषय आहे. पाचशे कोटीवरून ते एक हजार ६०० कोटीने खऱेदी केले गेले आहे. यात एक हजार १०० कोटीचा फरक आहे. त्यामुळे एक समिती नियुक्त करून याची चौकशी झाली पाहिजे. ते राष्ट्राच्या दृष्टीने योग्य आहे", असे श्री. चाकूरकर म्हणाले.

" आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांना घेवून आघाडी होत आहे.पण यात पाडापाडीचे राजकारण झाले नाही तर सरकार स्थापन करण्यासाठी जेवढी संख्या लागते तेवढी मिळू शकेल. एका पक्षाला ती मिळणार नाही," असे त्यांनी
स्पष्ट केले.

" राजकारणात निवृत्तीचे वय नसते.चालता येते, बोलता येते, काम करता येते तो पर्यंत राजकारणात काम केले पाहिजे. पण ते आपल्या मनावर नसते. लोकच आपल्याला निवृत्त करीत असतात," असे ते म्हणाले.

 यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, प्रदीप राठी, बी.व्ही. मोतीपवळे, शैलेश पाटील चाकूरकर, जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
 

संबंधित लेख