I will be MP in Next Elections Says Dhananjay Mahadik | Sarkarnama

धनंजय महाडिक म्हणतात...कोणी काहीही म्हणो 2019 चा खासदार मीच 

सदानंद पाटील 
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

गेल्या अनेक वर्षाचा कामाचा 'बॅकलॉग' मी पहिल्याच टर्ममध्ये भरुन काढला आहे. अजूनही हे काम अविरत सुरु आहे. मी कधीच कोणाच्या विरोधात काम केलेले नाही. पक्षाला शक्‍य ती मदतच केली आहे. जनतेचा माझ्या कामावर विश्‍वास आहे. हे कामच कोणत्याही उमेदवारला तारते - धनंजय महाडिक

कोल्हापूर : ''गेल्या चार वर्षात दोन वेळा संसदरत्न, देशातील सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा खासदार अशी आपली ओळख आहे. जिल्ह्यातील कामाचा विचार करता विनामनतळापासून रेल्वेपर्यंत आणि बास्केट ब्रिजपासून रस्ते सहापदरीकरणापर्यंत अनेक मोठी कामे मार्गी लावली आहेत. खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे काम करत आहोत. या कामाच्या जोरावरच जनता आपणाला पुन्हा 2019 ला निवडून देणार आहे. त्यामुळे महाडिक यांना तिकीट न देण्याची चर्चा करणे, राष्ट्रवादीतूनच कोणी उमेदवारीसाठी इच्छुक असणे याचा आपण अजिबात विचार करत नाही," असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले.

गोकुळ मल्टीस्टेटमुळे खासदार महाडिक हे अडचणीत येणार, त्यांचे तिकीट कापले जाणार, राष्ट्रवादीतून अन्य कोणाला तरी उमेदवारी मिळणार अशी जिल्ह्यात चर्चा आहे. याबाबत बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ''अशा प्रकारची चर्चा असली तरी यात काही तथ्य नाही. गेल्या अनेक वर्षाचा कामाचा 'बॅकलॉग' मी पहिल्याच टर्ममध्ये भरुन काढला आहे. अजूनही हे काम अविरत सुरु आहे. मी कधीच कोणाच्या विरोधात काम केलेले नाही. पक्षाला शक्‍य ती मदतच केली आहे. जनतेचा माझ्या कामावर विश्‍वास आहे. हे कामच कोणत्याही उमेदवारला तारते.'' मी तर देशात एक नंबरचे काम केले आहे, त्यामुळे उमेदवारी कापण्याचा विषय येतोच कोठे, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

गेल्या निवडणुकीत आपणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, युवा शक्‍ती, महाडिक गट आदींनी मला निवडून आणण्यात मदत केली आहे. यावेळीदेखील ही सर्व मंडळी बरोबर राहतील, आणि आपण 2019 साली पुन्हा निवडून येवू, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्‍त केला.

संबंधित लेख