महेश लांडगे आणि कुल यांना मीच वाली : महादेव जानकर

महेश लांडगे आणि कुल यांना मीच वाली : महादेव जानकर

पुणे : भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांना मीच वाली आहे, असे सांगून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज एका अनौपचारीक बैठकीत सांगून चांगलाच हास्यस्फोट घडवून आणला. त्यांनी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही फिरकी घेतली. तुमच्या मोठ्या पक्षाला भविष्यात माझ्यासाऱख्या छोट्या पक्षाला पाठिंबा द्यावा लागेल, असे जानकरांनी सांगितल्याने कांबळेंनीही हात जोडले.

पशुसंवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री कांबळे आणि जानकर एकत्र आले होते. कार्यक्रम सुरु व्हायला वेळ होता. त्यापूर्वी जानकर हे पशुसंवर्धन आयुक्तांच्या केबीन मध्ये आयुक्तांच्या खुर्चीवर बसले होते.  काही वेळाने मंत्री कांबळे केबिनमध्ये आले.  यावेळी जानकर यांनी खुर्चीवरुन उठुन कांबळे यांना खुर्ची दिली. यावेळी जानकर चेष्टेने कांबळे यांना म्हणाले,‘‘ तुमचा पक्ष (भाजप) मोठा आहे. आमचा पक्ष लहान आहे. त्यामुळे तुम्हाला खुर्ची द्यावी लागते. खुर्ची नाही दिली तर तुम्ही आम्हाला मारुन टाकाल. पण ध्यानात ठेवा. भविष्यात तुम्हाला आमच्यासारख्या लहान पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल.``

जानकर यांच्या विधानाला कर्नाटकमधील कालच्या घडामोडींचा संदर्भ होता. काल येथे भाजपच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागल्याने जानकर हे चेष्टेत बोलत होते. हा संवाद हास्यविनोदाने घेत कांबळे यांनी जानकर यांना हात जोडले. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे कांबळे आणि जानकर यांच्या हास्यविनानोदाकडे पाहत होते. यावेळी जानकर लांडगे यांना म्हणाले,‘‘ तू काय बघतो? तुला आणि राहुल कुलला मीच वाली आहे.`` जानकर असे म्हटल्यावर पुन्हा हास्यकल्लोळ झाला. महेश लांडगेंनाही जानकरांपुढे हात जोडावे लागले.

 नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे हे देखील या वेळी उपस्थित होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे अपक्ष निवडून आले असून ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असून त्यांची सध्या भाजपशी जवळीक वाढली आहे.

कार्यक्रमातही जानकर यांनी धमाल उडवून दिली. माझ्याकडील पशुसंवर्धन खाते आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मागत आहेत. हे खाते दुर्लक्षित होते. पण जेव्हा माझ्याकडे  जबाबदारी आली तेव्हाच या खात्यात जोरदार काम करण्याचं ठरवल. हे खाते मिळविण्यासाठी मंत्र्यांमध्ये मारामारी होईल, असं काम केलं. आता तसेच घडत आहे. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामगिरीमुळे पशुसंवर्धन आयुक्तालयासह एक हजार पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ प्रमाणपत्र कोणताही खर्च न करता मिळाले आहे. त्यामुळे हे खाते आता वजनदार झाले आहे.``
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com