I will Back Out If Abdul Sattar Wants to Contest Say Subhash Zambad | Sarkarnama

अब्दुल सत्तारांना निवडणूक लढवायची असेल तर मी माघार घ्यायला तयार- सुभाष झांबड

जगदीश पानसरे
रविवार, 24 मार्च 2019

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासह आमदारकीचा राजीनामा दिला असून औरंगाबादेतून अपक्ष लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद : "अब्दुल सत्तार हे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यामुळे मला विश्‍वासात न घेता झांबड यांना उमेदवारी दिली गेली हा त्यांचा दावा न पटण्यासारखा आहे. पक्षाने त्यांना जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी? यामागे काय राजकारण आहे हे त्यांनीच सांगावे," असे आवाहन कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झाबंड यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केले. औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पक्षश्रेष्ठींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्या अशी मागणी मी करतो, असे सांगत झाबंड यांनी सत्तारांच्या बंडाला प्रत्युत्तर दिले.

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासह आमदारकीचा राजीनामा दिला असून औरंगाबादेतून अपक्ष लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. एवढ्यावर सत्तार थांबले नाहीत, तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आता हायकमांड ऐकत नाही असे म्हणत त्यांनी रविवारी रात्री उशीरा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन कॉंग्रेस पक्षाला सूचक इशारा दिल्याचे बोलले जाते.

सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या बंडाच्या पावित्र्यावर औरंगाबाद लोकसभेचे अधिकृत कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्यांशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला. यावर आपली भूमिका मांडतांना झाबंड म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा विषय जेव्हा पक्षात सुरू होता तेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांनीच माझे नाव जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीने निवडणूक समितीकडे पाठवले होते. कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तेव्हा देखील अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, पण तेव्हा 'मै लोकसभा लढा तो सब गणित बिगड जायेगा' असे म्हणत सत्तार यांनी नकार दिला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा त्यांच्या नावाची पक्षात चर्चा व्हायची तेव्हा त्यांनी मला लोकसभा लढवायची नाही, असे स्पष्ट केले होते."

झांबड पुढे म्हणाले, "औरंगाबादच नाही तर जालना लोकसभा मतदारसंघातून देखील पक्षश्रेष्ठींनी या दोघांना उमेदवारी देऊ केली होती. नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यालाही या दोघांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर जालन्यातून विलास औताडे आणि औरंगाबादेतून माझी उमेदवारी जाहीर झाली. आता मला विश्‍वासात घेतले नाही असे जर अब्दुल सत्तार सांगत असतील तर ते योग्य नाही. सत्तार यांनी औरंगाबाद आणि जालना या दोन्ही मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास नकार दिला होता. मग आता माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा का केली? हे कोडे मलाही उलगडत नाहीये. यामागे कोणते राजकारण आहे हे खरे तर त्यांनीच स्पष्ट करायला हवे. या उपरही अब्दुल सत्तार यांना निवडणूक लढवायची असेल तर मी माघार घेतो आणि पक्षश्रेष्ठींना फोन करून त्यांना उमेदवारी द्यायला सांगतो,"असे सुभाष झांबड म्हणाले.

संबंधित लेख