I was the first person who said that Modi should become PM but : Raj thakray | Sarkarnama

राज ठाकरे म्हणतात ,मोदी पंतप्रधान व्हावेत हे मीच सर्वप्रथम बोललो होतो, पण ...

महेंद्र बडदे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सोशल इंजिनिअरींग सुरु असुन, जैन समाजात असलेली नाराजी दुर करण्याचा प्रयत्न त्यांनी मंगळवारी केला.

पुणे  : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सोशल इंजिनिअरींग सुरु असुन, जैन समाजात असलेली नाराजी दुर करण्याचा प्रयत्न त्यांनी मंगळवारी केला. मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही असे नमूद करीत प्रत्येकाने त्याचा धर्म, जात हा रस्त्यावर आणू नये अशी भुमिका असल्याचे त्यांनी मुकुंदनगर येथील एका सभागृहात आयोजित सभेत स्पष्ट केले. 

पर्युषण पर्वात मांसविक्रीवरून निर्माण झालेल्या वादात जैन समाज हा मनसेवर नाराज झाला होता. त्याचप्रमाणे अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनला विरोध केल्याने राज ठाकरे हे जैन, गुजराथी समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यापार्श्‍वभुमीवर ठाकरे यांनी जैन समाजाची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न पुण्यात केला. 

यापुर्वी त्यांनी बोरीवली येथे जैन समाजाशी संवाद साधला आहे. पुण्यात मुक्कामासाठी आल्यानंतर ठाकरे हे विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक यांची भेट घेत आहेत, तर काही त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मुकुंदनगर येथे बुधवारी सांयकाळी जैन समाजातील काही लोकांसमोर आपली भुमिका स्पष्ट केली. सुमारे दिडशे ते दोनशे जण यावेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे यांनी टिका केली. राज ठाकरे म्हणाले ," ते पंतप्रधान झाले पाहीजे हे मी प्रथम बोललो होतो . आज ते चुकत आहेत हे देखील मीच प्रथम सांगत आहे. कोणत्याही देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती आले की त्यांना अहमदाबादलाच का नेले जाते ? त्यांना मुंबई किंवा इतर शहरात का नेले जात नाही ? "

" अहमदाबाद मध्ये नैसर्गिक आपत्ती ओढविली होती, तेव्हा सगळे तिकडे लक्ष होते. केरळ मध्ये पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर आठ दिवस तिकडे कोणच फिरकले नाही. असा भेदभाव करणे योग्य नाही. नोटबंदी, जीएसटी याचा फटका तुम्हाला बसला तरीही तुम्ही काहीच बोलत नाही.'' असेही  त्यांनी नमूद केले.

तत्पुर्वी सुभाष राणावत, राजेश शहा, संकेत शहा, रोषण ओसवाल, राजेश परमार यांनी त्यांचे स्वागत केले. 

संबंधित लेख