I used to stand outside the meeting hall carrying my daughter : Girish Mahajan | Sarkarnama

दूधाची बाटली घेवून मुलीला सांभाळत सभागृहाबाहेर उभे रहायाचो : गिरीश महाजन

कैलास शिंदे 
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पत्नी सभागृहात असतांना मी दुधाची बाटली घेवून मुलगी सांभाळत बाहेर उभा असायचो.  हा अनुभव आपल्याला आजही आठवतो .पतीसाठी ते मोठे वाईट असते.मामा(आमदार भोळे)तुमच्या पत्नी महापौर झाल्या आहेत.  तुम्हाला हाच अनुभव लवकरच येईल . 

- गिरीश महाजन

जळगाव : " पत्नी जिल्हा परिषद  सदस्य असतांना आमची मुलगी सहा महिन्याची होती. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला पत्नी सभागृहात असतांना मी दुधाची बाटली घेवून मुलगी सांभाळत बाहेर उभा असायचो.  हा अनुभव आपल्याला आजही आठवतो .

पतीसाठी ते मोठे वाईट असते.मामा(आमदार भोळे)तुमच्या पत्नी महापौर झाल्या आहेत.  तुम्हाला हाच अनुभव लवकरच येईल ,"असा टोला  मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी आमदार सुरेश भोळे यांना  जाहिर सभेत लगावला . अन आज दुसऱ्याच दिवशी गुरुवारी महापालिकेच्या महासभेत आमदार सुरेश भोळे यांना त्याची प्रतिची आली .  

महापौर निवडीनंतर गुरुवारी  पहिलीच महासभा होती. पत्नी महापौर सीमा भोळे यांचे कामकाज आमदार सुरेश भोळे यांनी चक्क सभागृहात जनतेसाठी असलेल्या जागेवर बसून बघितले. 

जळगाव महापालिकेच्या निवडणूका नुकत्याच झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला 57 जागाचे बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी  (ता.10) भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. 

 यावेळी आमदार सुरेश भोळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रांगेत पुढे बसले होते. मात्र त्यांच्या पत्नी महापौर सीमा भोळे यांचे सभागृहात आगमन होताच ते मागच्या रांगेत गेले. त्यांच्या जागेवर महापौर भोळे बसल्या. 

ही बाब लक्षात घेवून मंत्री महाजन भाषण करतांना म्हणाले, " पत्नी पदावर आली कि पतीला मागेच सरावे लागले. याचा अनुभव मलाही आला आहे .  पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्या त्यावेळी आपली मुलगी सहा महिन्याची होती. जिल्हा परिषदेची सभा असतांना आपण दूधाची बाटली घेवून मुलीला सांभाळत सभागृहाबाहेर उभे रहायाचो. शिपाईसुध्दा जि.प.सदस्यांचा पती आहे असे म्हणत आपल्याला एखादी जागा करून द्यायचा.  पत्नीसाठी पतीला मागेच रहायला लागते . हा अनुभव वाईट असतो, तुम्हाला तो लवकरच येईल. "

आणि चक्क  दुसऱ्याच दिवशी भाजप आमदार सुरेश भोळे यांना अनुभव आला. महपालिकेची आज पहिलीच महासभा होती, महापौर सीमा भोळे अध्यक्षस्थानी होत्या. त्यामुळे पत्नी सभेचे कामकाज कसे करतात हे पाहण्यासाठी आमदार सुरेश भोळे सभागृहात हजर होते. सर्वात मागे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या जागेत बसून ते सभागृहातील कामकाज पाहत होते. महासभेच्या कामकाजाला आमदारांची उपस्थितीतीची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती.
 

संबंधित लेख