मी वाजपेयी सरकारच्या विरोधात भाषण केले आणि रात्री त्यांचा फोन आला : शरद पवार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. पवार यांच्या ६१ च्या सत्काराच्या कार्य़क्रमाला वाजपेयी उपस्थित होते. पुण्यात गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला हे दोघे आवर्जून एकत्रित आले होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उदघाटनाला हे दोघे एकत्र होते. पवार यांनी वाजपेयींबद्दलच्या आठवणींना दिलेला उजाळा.
मी वाजपेयी सरकारच्या विरोधात भाषण केले आणि रात्री त्यांचा फोन आला : शरद पवार

पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. 

पवार म्हणाले, "" मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना "पुलोद'च्या काळात जनता पार्टीच्या रूपाने वाजपेयींचे महाराष्ट्रातील सहकारी आमच्यासोबत होते. त्यावेळी बैठकीनिमित्त मी पहिल्यांदा वाजपेयी यांना भेटलो होतो.'' राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याशी सततचा संपर्क होता. 1996 साली वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पडले. तेव्हा मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होते. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततण ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी पाहिला. 

वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्यावतीेने मी त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर गेलो होतो. या दौऱ्यात रोजच्या-रोज ते आमच्याशी चर्चा करायचे. प्रत्येक विषयावर आपल्या देशाची भूमिका काय असावी, हे सांगायचे शिवाय त्यावर आमच्या सूचना असतील तर या सूचनांची तातडीने दखल घ्यायचे, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

गुजरातमध्ये २००२ मध्ये भूकंप आला होता. त्यात मोठी हानी झाली होती. भूकंप झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाचा मला अनुभव होता. मी स्वतः वाजपेयी यांनी गुजरातला याबाबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांच्याच सरकारच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचनांचाही ते नेहमी आदर करायचे, असा अनुभव पवार यांनी सांगितला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com