i nothing to do with me too but you tube | Sarkarnama

माझा संबंध MeToo शी नाही तर you tube शी : आठवले

ज्ञानेश सावंत
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

अभिनेत्री तनुश्री दत्त हीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अनेक मराठी अभिनेते, राजकारणी हे नाना पाटेकरांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. रामदास आठवले यांनी मात्र थेट भूमिका घेत पाटेकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

पुणे : Me Too प्रकरणातील  दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. 

माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास माझा संबंध मीटूशी नाही तर युट्यूबशी असल्याचे सांगत त्यांनी याही प्रश्नावर आपल्या नेहमीच्या पद्धतीने टोलेबाजी केली. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर उत्तर दिली.

दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा त्यांनी या निमित्ताने केली. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा रिपाइंसाठी सोडावी अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे. तसेच उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असेही यावेळी ते म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेना आणि भाजपची युती व्हावी. या दोघांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असाही तोडगा त्यांनी या निमित्ताने सुचविला.

 

संबंधित लेख