सगळ्या गुन्ह्यातून मी निर्दोष सुटलो, आरोप करणारे बिथरले आहेत : प्रशांत बंब
माझ्या विरोधात बिनबुडाचे आरोप करत हे स्वतःचे हसे करून घेत आहेत. माझ्या विरोधात हे कितीही एकत्रित आले तरी माझे त्यांना चॅलेंज आहे, पन्नास हजार मतांची लीड घेऊन मी निवडूण येणार आहे. राहिला प्रश्न निधी मिळवण्याचा तर ते माझे स्कील आहे.
औरंगाबाद : " माझ्या विरोधात दाखल झालेल्या सगळ्या गुन्ह्यांतून माझी निर्दोष सुटका झालेली आहे. अर्धवट माहितीच्या आधारे सुरू असलेल्या आरोपांमुळे ते किती बिथरले आहेत हे स्पष्ट होते. माझी मानसिकता मिडिया किंवा चॅनल ठरवणार आहे का? तुम्ही कोर्टात जा, माझ्या तक्रारी खोट्या सिध्द करून दाखवा", असे आव्हान भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात प्रशांत बंब यांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती नमूद केली होती. खंडणी, दरोडा आणि फसवणुकीसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज (ता.11) नागपूर येथील अधिवेशना दरम्यान दुसऱ्यांदा बंब यांच्यावर ब्लॅलकमेलिंगचा आरोप केला.
या आरोपांना उत्तर देतांना प्रशांत बंब म्हणाले, " माझ्यावर दाखल असलेला 420 चा गुन्हा वैयक्तिक पैशाच्या देवाण घेवाणीवरून झाला होता, त्यात तडजोड झाली. त्यामुळे कोर्टाने मला निर्दोष सोडले. दुसरा गुन्हा, मी सरपंच असताना भारत निर्माण योजनेतील कंत्राटदारांनी केलेला 9 लाखांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला तेव्हा कंत्राटदाराचे 1 लाखाचे पाईप उचलून आणल्याप्रकरणी दाखल झाला होता. तर तिसरा गुन्हा कार्यकर्त्यांना जमा करून टोलनाका बंद पाडल्यामुळे दरोड्याचा गुन्हा दाखल होता. "
" या तिन्ही प्रकरणात उच्च न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. आजघडीला हे गुन्हे झिरो झाले आहेत. माझ्या विरोधात एकत्रित येऊन आरोप करणारे आता बिथरले आहेत, हेच यावरून स्पष्ट होते. त्यामुळे गैरकारभार उघडकीस आणण्याचा वेग मी अजून वाढवणार आहे. आमदार म्हणून माझे ते कामच आहे आणि ते मी करतो. "
असा दावा प्रशांत बंब यांनी केला .
पन्नास हजारांच्या लीडने निवडून येणार
" माझ्या विरोधात बिनबुडाचे आरोप करत हे स्वतःचे हसे करून घेत आहेत. माझ्या विरोधात हे कितीही एकत्रित आले तरी माझे त्यांना चॅलेंज आहे, पन्नास हजार मतांची लीड घेऊन मी निवडूण येणार आहे. राहिला प्रश्न निधी मिळवण्याचा तर ते माझे स्कील आहे. मला दहा कोटींचा निधी मिळाला होता, तेव्हाही हे माझ्या विरोधात हायकोर्टात गेले होते, पण तिथेही तोंडघशी पडले. " असेही आमदार बंब म्हणाले .
प्रशांत बंब पुढे म्हणाले ,"जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदाराला 1 कोटी तर शिवसेनेच्या आमदारांना तीन कोटींचा निधी मिळतो मग याला ब्लॅकमेलिंग म्हणायचे का? प्राधिकरणाच्या माध्यमातून 458 कोटी आणि या व्यतिरिक्त आणखी एक हजार कोटी रुपयांचा निधी मी आणणार आहे, ते माझे स्कील आहे. तुम्हीही निधी आणा तुम्हाला कोणी रोखले? तेव्हा विनाकारण आरोप करू नका, माझ्या विरोधात एकाही अधिकारी, कंत्राटदाराची तक्रार नाही. कुणाचा एक रुपयाही मी हरामाचा घेतलेला नाही. "
"त्यामुळे माझ्या तक्रारी खोट्या सिध्द करा, कोर्टात जा. तुम्ही माझी एकही तक्रार खोटी सिध्द करू शकलेले नाही, उलट मी पन्नास पुरावे दिले आहेत. हा मुद्दा सभागृहात उपस्थित कराच, असे आव्हान देतानाच मलाही बाजू मांडण्याची संधी मिळेल", असे सांगत प्रशांत बंब यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.