I dye my hairs : Fadnvis | Sarkarnama

अहो, मी केसांना कलप करतो : मुख्यमंत्र्यांचे पारदर्शी उत्तर 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुख्यमंत्री म्हणून तीन वर्षे जबाबदारी सांभाळत असलेले देवेंद्र फडणवीस हे केसांना डाय करत असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच सांगितले. सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहायला मला आवडते. तसेच गेल्या तीन वर्षांत खासगी जीवन, हा शब्दही मी विसरलो असल्याचे फडणवीसांनी सांगितले. 

पुणे : मुख्यमंत्री म्हणून वैयक्तिक तीन वर्षे कशी गेली, तुमचे तर केसही फार पांढरे झालेले दिसत नाहीत, या प्रश्‍नावर अहो, मी कलप करतो, असे पारदर्शक उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे गेल्या तीन वर्षांतील खासगी जीवन कसे बदलले, असा प्रश्‍न विचारला. तुमचे तर केसही पांढरे झाले नसल्याचा उल्लेख सरदेसाई यांनी केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ""अहो, मी केसांना कलप लावतो. त्यामुळे माझे केस काळे दिसत आहेत. तसे तर तरुण वयातच माझे केस पांढरे झाले होते.'' पांढरे केस तुम्हाला मात्र शोभून दिसतात, असे सरदेसाईंना सांगण्यास फडणवीस विसरले नाहीत. यांनी सरदेसाईंना सांगितले. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर खासगी जीवन मात्र राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलीला शाळेत सोडविण्याइतपतही वेळ मिळत नाही का, या प्रश्‍नावर त्यांनी नाही, असे उत्तर दिले. ""फिरायला जाणेही आता थांबले आहे. मी कुटुंबियांना सोबत चुकून कुठे दौऱ्यावर घेऊन गेलो तर मी माझ्या मिटिंगमध्ये व्यस्त असतो. कुटुंबीय हॉटेलवर माझी वाट पाहत असतात. असे अनुभव यायला लागल्यापासून तर आता पत्नीच दौऱ्यावर यायला नकार देते,'' असे हसत फडणवीस यांनी सांगितले. 

""तुमच्यासाठी मोदी हे रोल मॉडेल आहेत. मोदींचा वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. तुम्ही दिल्लीत जाणार अशीही चर्चा होती. तुम्हाला नागपूरचा (संघाचा) पाठिंबा आहे. तुम्ही खरेच दिल्लीत जाल,'' या प्रश्‍नांवर फडणवीस यांनी भाजपच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांसाठी मोदी हे रोल मॉडेल असल्याचे सांगितले. तसेच "नागपूर'चा पाठिंबा महत्त्वाचा नसतो तर त्यांचे संस्कार महत्त्वाचे असतात, असे चतुर उत्तर दिले. पक्षाने वाटले आणि त्यांनी निर्णय घेतला तर दिल्लीला जाईलही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

संबंधित लेख