नाना पाटेकर असे काही करेल हे माझ्या मनाला पटत नाही : राज ठाकरे
नाना पाटेकर माझ्या परिचयाचा आहे. नाना असे काही करेल हे माझ्या मनाला पटत नाही. तो कधी वेड्यासारखा वागतो हे मला मान्य आहे.
- राज ठाकरे
अमरावती : " नाना पाटेकर माझ्या परिचयाचा आहे. नाना असे काही करेल हे माझ्या मनाला पटत नाही. तो कधी वेड्यासारखा वागतो हे मला मान्य आहे. अशा गोष्टी असतील तर त्या न्यायालयाने बघाव्यात. यात मीडियाचा काही संबंध नाही," असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तनुश्री दत्ता प्रकरणावर भाष्य करताना मांडले.
'मी टू' प्रकरण महागाई, रुपयांचे अवमूल्यन, भ्रष्टाचार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून सुरू केले असावे, असे मला वाटते. समाजात महिलांवर पुरुषी अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब होय. मीडियाने या गोष्टींचे गांभीर्य जपायला हवे. न्यायालये सक्षम आहेत. ते न्याय देतील. महिलाही सक्षम आहेत. असे सध्या चर्चेत असलेल्या 'मी टू' प्रकरणावर श्री अंबा फेस्टिव्हलनिमित्त श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 'राजरंग' या मुलाखतीच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते .
" नवरात्र सुरु आहे, मी महिलांचा सन्मान करतो. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. अनेक दुर्दैवी महिला या 'मी टू' प्रकरणातून गेल्या आहेत. ना लता मंगेशकर, आशा भोसले यासारख्या कर्तृत्त्ववान महिलांना शिखरावर पोहोचताना त्रास झाला नसेल का? टि्वटरवर 'मी टू' बोलत बसणे योग्य नव्हे. ही गंभीर बाब होय. त्याची चेष्टा होता कामा नये. त्यावेळी या महिलांमध्ये हिंमत नव्हती तर आता कुठून आली? "असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेबाबत प्रश्नाचे देताना राज ठाकरे म्हणाले की ," शिवसेनेला त्यांची भूमिकाच त्यांनाच समजलेली नाही . पैशाची कामे असली कि धमकी द्यायची आणि ती कामे झाली की धमकी मागे घ्यायची त्यांची पद्धत दिसते ."
" मला जेवढे प्रश्न प्रसार माध्यम मला विचारतात तेवढेच प्रश्न तुम्ही इतरांना का विचारत नाही माझ्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवता तर माझ्या पक्षाला तुम्ही भरभरून मते द्या,' असेही ठाकरे या मुलाखती दरम्यान म्हणाले .
अमरावती येथे अंबा फेस्टिवल मध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत सुरु असताना प्रसिद्ध चित्रकार विजय राऊत यांनी राज ठाकरेंचे पोर्ट्रेट बनवले . हे पोर्ट्रेट राज ठाकरेंना मुलाखतीच्या समारोप प्रसंगी देण्यात आले .