I challenged him to become guardian minister of Gadchiroli & he accepted it : mungantiwar | Sarkarnama

'आर. आर.'ना गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याचे चॅलेंज दिले आणि आबांनी ते तात्काळ स्वीकारले : मुनगंटीवार

सरकारनामा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

आर. आर. पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षण ज्या गांधी वसतीगृहात राहून पुर्ण केले. पुढे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करतानाही ते वसतीगृहाच्या खोलीतच रहायचे. त्या वसतीगृहाच्या आवारात होणारे हे स्मारक गरीब वंचित कुटुंबातून राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील. 

-अर्थमंत्री मुनगंटीवार    

सांगली: " एक संवेदनशील राजकारणी म्हणून मी आर. आर. पाटील यांना   अनुभवत होतो. 9 डिसेंबर 2009 रोजी विधानसभेत मी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या व्यथांवर बोलताना केवळ भाषणे करून नक्षलवाद संपणार नाही, अशी टीका  आर. आर. यांच्यावर केली. "

"या भाषणात मी आबांना  'गडचिरोलीचे पालकमंत्री व्हा' असे आव्हान दिले. एका विरोधी आमदाराच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी विधिमंडळात आपण पालकमंत्री होत आहोत, अशी घोषणा केली. गडचिरोलीच्या विकासासाठी ते मंत्रिमंडळ बैठकीत कायम आग्रही राहिले, '' अशी माहिती  वन आणि  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात दिली . 

मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक,   राज्यमंत्री दीपक केसरकर, सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते. अठरा कोटी रुपये खर्च करून हे स्मारक होणार आहे. आमदार सुमनताई पाटील यादेखील यावेळी उपस्थित होत्या. 

आर. आर.पाटील यांच्यासोबतच्या विधिमंडळातील अनेक आठवणींना मुनगंटीवार यांनी उजाळा दिला. ते म्हणाले ,"  मी नवखा आमदार म्हणून विधानसभेच्या ग्रंथालयात गेल्यानंतर गेल्या पाच वर्षांतील कुणाची भाषणे मी वाचू, असा प्रश्‍न मी ग्रंथपाल बाबा वाघमारे यांना केला. त्यांनी मला आर. आर. यांचे नाव सांगितले. त्याअर्थाने आर. आर.पाटील माझ्यासाठी प्रेरणा होते. युतीचा आमदार म्हणून सन 1995 च्या विधानसभेत पहिले भाषण केले. त्यानंतर "तुम्ही चांगले भाषण केलेत. तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.''असे पत्र त्यांनी मला आवर्जून पाठवले. 

 अजित पवार यांनीही आर. आर. यांच्या कर्तृत्वाचा पट मांडताना त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाल्याचे सांगितले.ते म्हणाले," विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आर. आर. पाटील यांच्यासारखे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते अल्पकाळात निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले.''

आमदार जयंत पाटील म्हणाले,"आर. आर. यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरवात केली. त्याचवेळी तासगाव मतदारसंघावर छाप टाकली. सत्तेत राहूनही त्यांनी नेहमीच जनतेचीच भूमिका मांडली. सत्तेतही त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे लोकांसाठी सोने केले. त्यांच्या निधनाने राष्टवादी कॉंग्रेसची मोठी हानी झाली याचे मोठे शल्य मला आहे.''

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी प्रास्ताविक केले. अठरा महिन्यात स्मारकाचे काम पुर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर यांची भाषणे झाली. आमदार सुमन पाटील यांनी शासनाने स्मारक उभारणीसाठी राजकारण निरपेक्षपणे दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह विविध पक्षीय नेते उपस्थित होते.
.

 

संबंधित लेख