I avoided Delhi after Modi`s statement | Sarkarnama

मोदींच्या "त्या' वक्तव्यानंतर मी महिनाभर दिल्ली टाळली : पवार 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे : राजकारणात मी कुणाला तरी बोट धरून आणल्याचे वक्तव्य मी मध्यंतरी ऐकले. त्यानंतर दिल्ली जाण्याचेच मी टाळले. अगदी जायची वेळ आली तर गेल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांना भेटण्याचेही मी टाळले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात दिले. 

पुणे : राजकारणात मी कुणाला तरी बोट धरून आणल्याचे वक्तव्य मी मध्यंतरी ऐकले. त्यानंतर दिल्ली जाण्याचेच मी टाळले. अगदी जायची वेळ आली तर गेल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांना भेटण्याचेही मी टाळले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात दिले. 

पवार यांनी बोट धरून आपल्याला राजकारणात आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची चर्चा त्यावेळी माध्यमात मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी आजच्या कार्यक्रमात खसखस पिकवली. दिल्लीला जायचे का व कोणामुळे बंद केले, या विषयी सांगताना ते म्हणाले की माझे बोट धरून राजकारणात आलो, असे स्टेटमेंट मी ऐकले. बोलणारी व्यक्ती अशी मोठी होती की मी पुढे महिनाभर दिल्लीला जाण्याचे टाळले. 

सत्तेत असताना कसा व्यापक विचार करावा लागतो, याबाबत पवार यांनी पुण्यात आज भाष्य केले. ते म्हणाले,"" केंद्रीय 
कृषिमंत्री म्हणून मी ही व्यापक भूमिका कायम ठेवली. गहू-तांदाळाची आयात करणारा देश चार वर्षात या धान्याची निर्यात करू लागला. त्यासाठी खूप कष्ट घेतले. हे काम करताना कॉंग्रेस आणि कॉंग्रेसेतर पक्षांची सरकारे असा भेद केला नाही. सत्तेत काम करताना आपण साऱ्या जनतेच्यावतीने काम करीत असतो. त्यात पक्षीय अभिनिवेश येता कामा नये, ही माझी सुरवातीपासूनची भूमिका आहे.'' 

"केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाचे सरकार असणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यातही खूप काम केले. त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यानीही खूप मेहनत घेतली. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचाही त्यात समावेश होता. त्यांच्या पक्षाची विचारसरणी वेगळी असली तरी गुजरातमध्ये शेतीशी संबंधित अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. त्यातील अनेक कार्यक्रमांना कृषिमंत्री या नात्याने गेलो. त्यामुळे बोट धरून राजकारणात आणले असे म्हटले असावेत,'' असे पवार यांनी स्पष्ट केले. 

दिवंगत धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मेधा पुरव-सामंत, विवेक खटावकर आणि हर्षा शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, रामदास फुटाणे,  उल्हासदादा पवार, मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे आदी सर्वपक्षीयांनी यावेळी गर्दी केली होती.

`एकटे' नारायण राणे

विलासराव देशमुख यांचे लाडके असणारे धनंजय थोरात पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते होते. तरी सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांची जीवाभावाची मैत्री होती. त्यामुळेच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यासपीठावर गर्दी केली होती. त्याचा संदर्भ घेत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी टिप्पणी केली, "या कार्यक्रमाला एकटे 'नारायण राणे' असते तरी हा कार्यक्रम 'सर्वपक्षीय' झाला असता." फुटाणेंच्या या टिप्पणीला शरद पवारांसह सर्वांनी खळखळून हसून दाद दिली. 
 

संबंधित लेख