I am going to make Rajesh minister | Sarkarnama

तुमचा मुलगा राजेश चांगल काम करतोय, त्याला मी मंत्री करणार

  राजेश टोपे, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस घनसांवगी 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

.

घनसावंगीः 2004 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. दरम्यान पवार साहेब दुर्धर आजारावर उपचार घेत होते. माझ्यासह राष्ट्रवादीचे काही नेते, पदाधिकारी त्यांनी रुग्णालयात भेटायला गेलो.

तेव्हा ते म्हणाले, 'तुम्हाला सेनापती शिवाय लढावे लागणार आहे' त्याचे हे वाक्‍य ऐकून आम्ही भावूक झालो. पण शस्त्रक्रियेनंतर आठच दिवसांनी साहेब प्रचारासाठी बाहेर पडले. संपुर्ण राज्यात त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला आणि केवळ राज्यात नाही तर केंद्रातही आघाडीची सत्ता आली . 

तेंव्हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळातच साहेबांचा आजार बळावला आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. आपल्याला प्रचाराला जाता येणार नाही याची खंत त्यांच्या मनात होती. 

शस्त्रक्रिया झाल्यांनतर पवार साहेबांना डॉक्‍टरांनी सहा महिने बाहेर पडायचे नाही अशी सक्त ताकीद दिली होती. पण त्यांना स्वस्थ बसवेना आणि आठवडाभरातच ते प्रचारासाठी बाहेर पडले. पुढे राज्यभराच्या प्रचाराची धुरा साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि चमत्कार घडला. राज्यात  कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले तसेच लोकसभेतही महाराष्ट्रातून जास्त खासदार निवडून  आल्याने  केंद्रातही  सरकार आले . 

जालना जिल्ह्यात तेंव्हा  निवडणुकीत आघाडीला शंभर टक्के यश मिळाले होते. माझे वडील दिवगंत अंकुशराव टोपे यांनी पवार साहेबांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले . तेव्हा जिल्ह्यातील विजयाबद्दल साहेबांनी वडीलांचे अभिनंदन तर केलेच, पण तुमचा मुलगा राजेश चांगल काम करतोय, त्याला मी मंत्री करणार असून महत्वाची जबाबदारी टाकणार असल्याचे सांगत कौतुक केले होते. 

प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि संकटांना परतवून लावण्याची हिंमत या पवार साहेबांच्या गुणांची माझ्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणावर छाप कायम आहे. 

(शब्दांकन :  सुभाष बिडे )  

संबंधित लेख